मुक्तपीठ टीम
मुंबई आणि उपनगरात एमडी आणि चरसची विक्री करणार्या एका महिलेस घाटकोपर युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. नजमा अहमद शेख असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी ७३ लाख रुपयांचा एमडी, चरस आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात ड्रग्ज विक्री करणार्या अनेक टोळ्या कार्यरत असून या टोळीकडून त्यांच्या हस्तकाच्या मदतीने ड्रग्जची तस्करी केली जाते, त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला देण्यात आले होते, या आदेशांनतर पोलिसांनी अशा ड्रग्ज तस्काराची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु केली होती, ही शोधमोहीम सुरु असतानाच वांद्रे परिसरात एमडी ड्रग्जची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली लता सुतार, पोलीस उपनिरीक्षक खंडेराव बोबडे, पोलीस हवालदार यादव, दरगडे, पोलीस नाईक चौरे, पोलीस शिपाई शेगावकर, महाले, महिला पोलीस शिपाई डुंबरे, पोलीस हवालदार चालक वाघ यांनी बीईएसटी इलेक्ट्रीक पोल क्रमांक एचएजे/०९४/१६७ जवळ, पटवर्धन गार्डन गेटसमोरील लिंकींग रोड, वांद्रे परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवार १५ जानेवारीला तिथे नजमा शेख ही महिला आली होती, तिची हालचाल संशयास्पद वाटताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, तिची अंगझडतीत घेतल्यांनतर पोलिसांना दहा लाख रुपयांचे शंभर ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि वीस हजार रुपयांची कॅश जप्त केली.
हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता, याच गुन्ह्यांत तिला अटक करुन नंतर तिला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. तपासात नजमा ही माहीम येथील माहीम डेपो, जनता सेवक सोसायटीमध्ये राहत असल्याचे उघडकीस आले. पोलीस कोठडीत तिची चौकशी केली असता तिने कुर्ला येथे भाड्याने एक फ्लॅट घेतल्याचे सांगितले, या फ्लॅटमध्येच ती ड्रग्जची साठवणूक करीत होती, त्यानंतर तिच्या चौकशीनंतर रविवारी पोलिसांनी कुर्ला येथील एलबीएस मार्ग, मानवदृष्टी सोसायटीच्या बी विंगच्या फ्लॅट क्रमांक ७०५ मध्ये छापा टाकला होता, या छाप्यात पोलिसांनी ५४ लाख रुपयांचा २ किलो ७०० ग्रॅम वजनाचे चरस आणि ९ लाख ४५ हजार रुपयांची कॅश असा ६३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दोन्ही कारवाईत पोलिसांनी शंभर ग्रॅम वजनाचे एमडी, २ किलो ७०० ग्रॅम वजनाचे चरस आणि ७ लाख ६५ हजार रुपयांची कॅश असा ७३ हजार ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नजमा ही ड्रग्ज तस्करीतील रेकॉर्डवरील आरोपी असून तिने मुंबईसह उपनगरात यापूर्वी ड्रग्ज तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिचे इतर कोणी सहकारी आहेत, तिने ते ड्रग्ज कोठून आणले, ते ड्रग्ज कोणाला विकले याचा पोलीस तपास करीत आहेत. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक खंडेराव बोबडे हे तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.