मुक्तपीठ टीम
डिसेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौरा करणार आहे. यावेळी ते २८ डिसेंबरला, कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. अशीच सभा भाजपा सत्तेत असताना २८ डिसेंबर २००३ रोजी मुंबईच्या याच मैदानात झाली होती. त्यावेळी सोनिया गांधींच्या सभेनंतर काँग्रेसची देशातील सत्तावापसीची सुरुवात झाली होती. आता तसे पुन्हा घडणार का, काँग्रेस तेवढ्या क्षमतेनं प्रयत्न करु शकणार का, अशी चर्चा सुरु आहे.
राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा
- २८ डिसेंबरला काँग्रेस स्थापना दिवस आहे.
- आणि याच दिवशी राहुल गांधी शिवतीर्थावर येऊन सभा घेणार आहे.
- शिवतीर्थावर काँग्रेसने या आधी अनेक सभा घेतल्या आहेत मात्र, राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा असणार आहे.
- यापूर्वी २००३ आणि २००६ मध्ये कॉंग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती.
- त्यानंतर २०१८ मध्ये राहुल गांधींकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली.
- मात्र, ती नाकारली गेली.
- मोजक्या १६ दिवसांसाठीच शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेता येतो.
- या व्यतिरीक्त वर्षातले जास्तीत जास्त ४० दिवस शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेतले जातात.
- मात्र, त्याची परवानगी नगरविकास विभागाकडून घ्यावी लागते.
- कॉंग्रेसच्या येत्या सभेची परवानगीही नगरविकास विभागाकडून घ्यावी लागेल.
ऑगस्ट महिन्यापासून राहुल यांच्या सभेची तयारी
- राहुल गांधी यांना मुंबईमध्ये आमंत्रित करण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यांपासूनच करण्यात आले होते.
- ६ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली होती.
- या बैठकीतदेखील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी २८ डिसेंबर या काँग्रेसच्या स्थापना दिली मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा घेणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली होती.
झाकिर अहमदांचा पुन्हा इतिहासाच्या पुनरावृत्तीचा दावा
काँग्रेसचे राज्य सरचिटणीस झाकिर अहमद यांना या सभेविषयी ‘मुक्तपीठ’ने विचारले असता त्यांनी ही सभा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. अद्याप यावर अधिकृत माहिती नाही. पण जेव्हाही सभा होईल तेव्हा ती काँग्रेस अध्यक्षा २००३मधील सोनिया गांधीच्या सभेची आठवण करून देणारी महासभा असेल असे सांगितले. ती सभाही २८ डिसेंबरला झाली होती. मुंबईतील त्या सभेनंतर काँग्रेसची सत्तेतील वापसी झाली होती. आताही तसेच घडेल. नवी काँग्रेस, नवे राहुल गांधी देशाला पुन्हा सुख-शांती-समाधान देणारं नेतृत्व देतील, असाही दावा त्यांनी केला.
मुक्तपीठ विश्लेषण – तुळशीदास भोईटे
सोनिया गांधींच्या सभेसारखीच ही सभा महाराष्ट् काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे यशस्वी करून दाखवतीलही. पण त्यानंतर काँग्रेसची सत्तावापसी होण्याचं बळ मिळण्यासाठी त्यावेळसारखी आज परिस्थिती नक्की आहे का ते तपासावं लागेल. सर्वात मोठा फरक त्यावेळी देशातील सत्तेत भाजपा जरी होती तरी तिचं नेतृत्व करणारे अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रभाव पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्यांची प्रकृतीही साथ देत नव्हती. त्यातच भाजपाचे पक्ष संघटनही आजच्यासारखे बुथपुढे पन्नाप्रमुखापर्यंत पोहचले नव्हते.
आज नेतृत्व आणि संघटनात्मकदृष्ट्या भाजपा मजबूत आहे.
भाजपाचे तत्कालीन नेतृत्व हे तसं खूपच संमजस होतं. आजच्या नेतृत्वासारखं बुलडोझर पॅटर्ननं विरोधाला सपाट करण्याचा प्रयत्न करणारे नव्हते. त्यामुळे टोकाचा विरोधही चालून जात असे. आता काँग्रेसला सत्तावापसी करायची असेल तर संघटनात्मक बांधणी मजबूत करावी लागेल. तसेच योग्य मुद्द्यांसह भाजपाच्या जाळ्यात न अडकता लोकांशी नातं जुळवावं लागेल.
शिवसेनेसारख्या प्रादेशिक मित्रपक्षांशी असलेलं नातं वाढवावं लागेल. परिस्थिती महागाईची तशीच असली तरी पर्याय आम्हीच आहोत, हे पटवण्यासाठी तशी कृतीही करावी लागेल. तीही सातत्यपूर्ण अशी! तर किमान भाजपाचा पर्याय म्हणून मतदार विचार करतील. आणि मग २०२४पर्यंत काँग्रेस केवळ लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी मैदानात उतरू शकेल.