मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना आवाहन केले होते. त्यांनी म्हटलं की, “सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा. पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे. तसेच सरकारला उत्तरं देण्याची संधीही द्यावी.” पण सभागृहात विरोधकांनी त्यांना बोलूच दिले नाही. संसदीय परंपरेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय करुन देऊ लागताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरु झाली. महागाई, शेती कायदे, सरकारी हेरगिरी या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे अखेर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. दिवसभरातील या गोंधळात सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो पगॅसिस या स्पायवेअरचा वापर करुन भाजपा सरकार विरोधक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची हेरगिरी करत असल्याचा. सरकारने या आरोपांचा स्पष्ट शब्दात इंकार केला आहे.
पगॅसिस या स्पायवेअरचा वापर करुन भाजपाचे सरकार पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले गेले आहेत. त्यांची हेरगिरी केली जात आहे, असा विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आरोप केला. सरकारला धारेवर धरले. मात्र सरकारने विरोधकांचा हा दावा फेटाळला आहे. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत या प्रश्नावर सरकारची भूमिका मांडली. डेटामध्ये फोन नंबर्स असल्याने त्यामुळे हॅक झाल्याचं स्पष्ट होत नाही, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. डेटामुळे सर्व्हिलान्स झालं हे स्पष्ट होत नाही. एनएसओनेही त्यांच्या पगॅसिस या स्पायवेअरचा वापर करुन हेरगिरीची बातमी चुकीची आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी दोन्ही सभागृहांना सांगितलं. यावेळी देशातील सर्व्हिलान्स प्रोटोकॉल्सची त्यांनी माहिती दिली. तसेच कोणत्याही प्रकारे अवैध सर्व्हिलान्स करणं आपल्या देशातील व्यवस्थेत शक्य नाही, असा दावाही त्यांनी केला.
संसदेत काय घडलं?
- पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वीच लोकसभेत विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले की बरीच महिला आणि दलित बांधव मंत्री झाल्याचा त्यांना आनंद आहे, परंतु विरोधकांना ते आवडलेलं दिसत नाही. आमचे बरेच मंत्री ग्रामीण भागातून येतात. - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयकं मंजूर करण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न आहे. तर महागाई, शेती कायद्यासह अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सभागृहात नोटीस दिली आहे.
- विरोधकांनी का घातला गोंधळ?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी करत लोकसभा सभागृह डोक्यावर घेतलं. शेतकरी आंदोलन, वाढती महागाई, नुकतेच उघडकीस आलेले नेते, पत्रकार हेरगिरी प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांचे खासदार सरकारविरोधात घोषणा देत होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना नव्या मंत्र्यांचा परिचय करुन देता आला नाही. - विरोधकांकडून संसदीय परंपरेचा भंग: राजनाथ सिंह
पंतप्रधानांना लोकसभेत बोलू न देण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विरोधकांनी संसदीय परंपरा मोडली आहे. नवीन मंत्र्यांची ओळख होऊ दिली गेली नाही. हे दुर्दैवी आहे. - लोकसभेची कारवाई दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आली
गोंधळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी अडीचपर्यंत तहकूब केले. त्यांनीही विरोधकांच्या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. - राज्यसभेचे कामकाजही स्थगित करण्यात आले.
नुकतेच निधन झालेले राज्यसभा सदस्य डॉ. रघुनाथ महापात्रा आणि राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विरोधकांकडून शेती, महरागाई आणि हेरगिरीप्रकरणी नोटीस
- काँग्रेसचे लोकसभेचे खासदार मनीष तिवारी यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांबाबत सभागृहात सभा तहकुबीची नोटीस दिली.
- इंधन दरवाढ आणि महागाई या विषयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.
- भाकपचे राज्यसभेचे खासदार बिनॉय विश्वाम यांनी पेगॅसस स्पायवेअर प्रकटीकरणासंदर्भात नियम २६७ अंतर्गत सभा तहकूबी नोटीस दिली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान म्हणालेत लस घ्या बाहुबली व्हा! लोकसभेत गोंधळामुळे मोदींना बोलताच आलं नाही!!