मुक्तपीठ टीम
कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही थेरपी संसर्गाचे प्रमाण कमी करणे आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमधून ही थेरपी काढून टाकण्यात आली आहे. एम्सच्या नॅशनल टास्क फोर्स आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त मॉनिटरिंग समुहाने तशा सुधारित क्लिनिकल मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.
आयसीएमआर काय म्हणतेय?
- जगभरातील रूग्णांवरील उपचारांचा आकाडा प्लाझ्मा थेरपी प्रभावी असल्याचे सिद्ध करत नाही.
- विशेष बाब म्हणजे सप्टेंबर २०२० मध्ये आयसीएमआरने आपल्या अभ्यासात असे सांगितले की प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात उपयुक्त नाही.
- तरीही भारताला क्लिनिकल प्रोटोकॉलमधून काढण्याचा निर्णय घेण्यात ८ महिने लागले.
प्लाझ्मा थेरपीच्या अवास्तव महत्वाला आधीपासूनच होता विरोध
- देशातील कोरोनाचे वाढत्या प्रमाणामुळे प्लाझ्माची मागणी वाढली आहे.
- एकीकडे मागणी आणि वापर वाढत असतानाच, तज्ज्ञांनी कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेबद्दल चिंता व्यक्त केली होती.
- या आधीही वैद्यकीय व्यावसायिकांनी प्लाझ्मा थेरपी तेवढी उपयोगी असल्याचे म्हटले होते.
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
- प्लाझ्मा थेरपीला कॉन्व्लेसेन्ट प्लाझ्मा थेरपी असेही म्हटले जाते.
- यात कोरोनातून बरे झालेल्यांच्या शरीरातून प्लाझ्मा काढून तो कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरात इंजेक्शनच्या मदतीने इंजेक्ट केला जातो.
- कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याने तो प्लाझ्मा संसर्गित रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो.
- परंतु अद्याप प्लाझ्मा थेरपीने कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होतात हे सिद्ध झालेले नाही.
- पण यावर केलेल्या काही संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, या थेरपीमुळे रुग्णांची कोरोना विषाणूंशी लढण्याची शक्ती वाढते, असा दावा करण्यात आला आहे.
प्लाझ्मा थेरपी प्रोटोकॉलमधून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने आता का घेतला?
- गेल्या आठवड्यात आयसीएमआर आणि टास्क फोर्सची बैठक झाली.
- सर्व सदस्यांनी प्लाझ्मा थेरपी प्रभावी नसल्याचे आणि त्यास उपचारांच्या यादीतून हटवण्याचे सांगितले.
- काही वैज्ञानिकांनी आणि डॉक्टरांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के.के. विजयराघवन यांना पत्रही लिहिले.
- त्यात म्हटले आहे की प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग बंद करावा.
- आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे.
प्लाझ्मा थेरपीचा उपचार सुरूचं ठेवला तर नव्या व्हेरिएंटचा धोका-
- आरोग्य व्यावसायिकांनी असे म्हटले आहे, की कोरोनावरील उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी असल्याचा काहीही पुरावा नाही.
- काही प्राथमिक पुरावे देखील उघड झाले आहेत, त्यानुसार, जेव्हा प्लाझ्मा थेरपी अत्यंत कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दिली तर प्रतिरोधक क्षमता कमी होते आणि व्हेरिएंट उद्भवू शकतात.
इतर देशांतील संशोधनात काय समोर आले?
- ब्रिटन मधील ११,००० लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आहे.
- हीच गोष्ट अर्जेंटिनामध्ये झालेल्या संशोधनात समोर आली. तेथील डॉक्टरांनीही प्लाझ्मा थेरपी प्रभावी असल्याचे मानले नाही.
- गेल्या वर्षी, आयसीएमआरने एक संशोधन देखील केले ज्यामध्ये असे आढळले कीसंसर्गाचे प्रमाण कमी करणे आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर नसल्याचे सांगितले.