मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारपुढे आव्हानं मात्र कायम असणार. शिवसेनेतील बंडखोरांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईपासून अनेक मुद्द्यांचा सामना करावा लागणार. तशा प्रसंगी विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्ती महत्वाची भूमिका बजावणारी ठरणार आहे. त्यामुळेच बहुधा भाजपाने विधानसभा अध्यक्षपदासाठी मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपा आमदार राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे.
गुरुवारी शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर आता नवीन मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून आमदार राहुल नार्वेकर यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे. रविवारी सभापतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यांची या पदासाठी भाजपाने निवड करायचे कारण केवळ कायदेशीर ज्ञान नसून त्यांचं भूतकाळात शिवसेनेशी आणि राष्ट्रवादीशी असलेलं राजकीय नातं हेही असल्याची चर्चा आहे. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराज नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत, जे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत.
कोण आहेत राहुल नार्वेकर?
- राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार आहेत.
- राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात झाला.
- त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
- त्यांचा भाऊ मकरंद कुलाब्यातून नगरसेवक आहे.
नार्वेकर हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई!
- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे जावई आहेत.
- रामराजे नाईक-निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आहेत.
शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते!
- राहुल नार्वेकर हे सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रवक्ते होते.
- २०१४ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढले!
- राहुल नार्वेकर यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली होती.
- त्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून पराभव झाला होता.
२०१९ मध्ये भाजपात प्रवेश
- २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी कुलाबा येथून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
- कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली.