मुक्तपीठ टीम
गोव्यात येत्या १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिवस व्हलेन्टाइन डे म्हणून प्रेमाचा दिवस साजरा होणारा, त्यातही पुन्हा गोव्यासारखं रोमँटिक ठिकाण. पण अशा वातावरणात सत्ताधारी भाजपाने एका तरुणाचे ह्रदय दुखावले आहे. हा तरुण म्हणजे उत्पल पर्रीकर. भाजपाने गुरुवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असताना त्यात उत्पलचे नाव नाही. उत्पल कदाचित परिवारामुळे शांत होईलही, मन दुखावल्यामुळे होणार नाही, पण त्याच्या बंडाच्या भाषेमुळे भाजपाच्या कडवट समर्थकांच्या मनातही चलबिचल नक्कीच झाली. त्यामुळे भाजपाला गोव्यात रुजवणाऱ्या, वाढवणाऱ्या मनोहर पर्रीकरांच्या मुलाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.
कोण आहेत उत्पल पर्रीकर?
- उत्पल पर्रीकर हे भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.
- मनोहर पर्रीकर यांना दोन मुलं, उत्पल आणि अभिजीत.
- उत्पल हे अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे पदवीधर आहेत.
- उत्पल यांच्या पत्नीचे नाव उमा सरदेसाई आहे.
- उमा यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
- त्यांना ध्रुव नावाचा मुलगा आहे.
मनोहर पर्रीकरांचं राजकीय वारसा पुढे नेण्याचा उत्पलचा संकल्प
- मनोहर पर्रीकर हयात असतानाही उत्पल पडद्यामागून सक्रिय होते.
- मात्र, थेट राजकारणात ते कधीही सक्रिय नव्हते.
- उत्पल पर्रीकर भाजपा नाराज आहेत कारण त्यांना त्यांच्या वडिलांच्या परंपरागत मतदारसंघ असणाऱ्या पणजीतून विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा होती.
- मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारीबाबत कधीच विश्वासात घेतले नाही, त्यामुळे त्यांनी पणजीत प्रचार सुरू केला.
- गोव्याची जबाबदारी असणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्यांचा मुलगा म्हणून कोणाला उमेदवारी देत नाही, असे म्हटल्याने उत्पल अधिक संतापले.
- यानंतर उत्पलही संतापले. ते जाहीररीत्या म्हणाले, “गोव्यात ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, मी त्याला सहन करू शकत नाही. जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष आहे का? चारित्र्य आणि प्रामाणिकपणा यामुळे काही फरक पडत नाही?”
उत्पलना पणजीतूनच उमेदवारी का पाहिजे होती?
- गोव्यातील पणजी विधानसभेच्या जागेवर भाजपाचे दीर्घकाळ वर्चस्व आहे.
- मनोहर पर्रीकर येथून सहा वेळा आमदार होते.
- १९९४ मध्ये ते या जागेवरून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
- त्यानंतर १९९४, २००२, २००७, २०१२ मध्येही ते आमदार झाले.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मनोहर पर्रीकर केंद्रात गेले आणि संरक्षण मंत्री झाले.
- पर्रीकर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत संरक्षण मंत्री राहिले.
- त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
- २०१७ मध्ये पर्रीकर पुन्हा या जागेवरून विजयी झाले.
- पर्रीकर यांचे १७ मे २०१९ रोजी निधन झाले.
- त्यांच्या निधनानंतर या जागेवरील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अतानासियो मोन्सेरात विजयी झाले, जे आता भाजपामध्ये आहेत.
- उत्पल या जागेवरून तिकिटाची मागणी करत आहेत.
- तेथून आता भाजपाने बार्बोस यांना उमेदवारी दिली आहे.
जर उत्पल शांत झाले तरीही अस्वस्थता पेरली गेली…
- उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह सोडावा, असे सुचवत फडणवीसांनी दोन पर्याय दिले आहेत.
- भाजपाने त्यांना पणजी किंवा इतर ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देण्याची ऑफर दिली आहे.
- उत्पल यांना शिवसेना, आप आणि तृणमूल काँग्रेसनेही ऑफर दिली आहे.
- अद्याप उत्पल यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
- स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते उत्पल शांत झाले, बंड केले नाही तरी त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे भाजपाचा मूळ आधार असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या मनात अस्वस्थता मात्र पेरली गेली आहे.