मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई बँक मजूर असल्याचं दाखवून सातत्यानं निवडणूक लढवून सत्ताधारी होण्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. या गुन्ह्यात दरेकर यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याच्या मागणीला न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुळात आपचे नेते धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यास दोन महिन्यांचा वेळ घेतलेल्या सत्ताधारी आघाडीची भूमिका दरेकरांविषयी काहीशी मवाळच मानली जाते. त्यामुळे आता त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यापूर्वी अटक होणार की आघाडीतील जुनी आणि नवी मैत्री त्यांना वाचवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
न्यायालयात काय घडलं?
- मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर दरेकर यांच्या वकिलांनी बुधवारी सकाळी याचिका सादर केली.
- तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची आणि दरेकर यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी केली.
- दुपारी साडेचारच्या सुमारास दरेकर यांच्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली.
- त्या वेळी दरेकर हे तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत.
- त्यामुळे याचिका प्रलंबित असेपर्यंत त्यांना कठोर कारवाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी दरेकर यांच्या वकिलांनी केली.
- मात्र दरेकर यांनी थेट उच्च न्यायालयात येण्यापूर्वी अन्य कायदेशीर पर्यायांचा अवलंब करावा, असे नमूद करून खंडपीठाने दरेकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
- न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी मात्र दोन आठवड्यांनी ठेवली आहे.
आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य ठरणार नाही!
- दरेकरांविरोधात तूर्त कोणतीही कठोर कारवाई न करण्याची हमी देता येणार नाही, असे सरकारी वकिलांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
- हे प्रकरण केवळ दरेकरांनी मजूर असल्याबद्दल दिलेल्या चुकीच्या माहितीला अनुसरून दाखल करण्यात आले आहे.
- सहकार विभागाच्या सहनिबंधकांनी दरेकर यांचे मजूरपद रद्द केले आहे.
- मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत असलेल्या मुंबै बँकेतील घोटाळ्याशी या प्रकरणाचा थेट संबंध नाही.
- शिवाय दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन दोनच दिवस झाले आहेत.
- त्यामुळे तपास अगदीच प्राथमिक अवस्थेत असताना आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य ठरणार नाही.
- शिवाय कारवाईपूर्वी ७२ तासांची नोटीसही देता येणार नाही, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराचे आरोप रोखण्यासाठीच आपल्यावर गुन्हा दाखल- प्रवीण दरेकर
- राज्य सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप रोखण्यासाठीच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वर्तमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक या दोघांना अटक झाल्याचा सूड उगवण्यासाठी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण दरेकरांविरोधाती गुन्ह्याचं नेमकं प्रकरण समजून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करून नक्की वाचा…
प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा!
प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!
विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीस आक्रमक
प्रवीण दरेकरांविरोधातील एफआयआरमध्ये काय म्हटलंय? एफआयआर जसा आहे तसा…