मुक्तपीठ टीम
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी संजय राऊत यांनी समर्थकांना आणि शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपावर ताशोरे ओढले. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली. आता प्रश्न असा आहे की, संजय राऊत म्हणतात तशी त्यांची अटक भाजपाला खरंच महाग पडणार? जाणून घ्या वास्तव…
संजय राऊत त्यांच्या भांडूप येथील घरी आल्यानंतर शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले, आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली.
संजय राऊतांची विधानं ही सत्ताधारी भाजपाचे लक्ष्य ठरलेल्या एका पीडित विरोधी नेत्याचा संताप म्हणून नजरेआड करता आली असती. पण न्यायालयाने त्यांना जामीन देताना नोंदवलेली निरीक्षणं ही भाजपाच्या भ्रष्ट्राचारविरोधी भूमिकेच्या दाव्याला सुरुंग लावण्यासाठी विरोधक देशभर वापरू शकतात. आजवर सर्वच भाजपाकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या आरोपांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
न्यायालयाने जामीनच दिला नाही ईडीचे वाभाडेच काढले…
- दिवाणीवादाचे स्वरूप असूनही ‘मनी लॉड्ररिंग’चे नाव दिल्याने तसा गुन्हा दाखल होत नाही. यामुळे निष्पाप लोकांना त्रास होतो.
- ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली आणि संजय राऊत यांना तर कोणतेही कारण नसताना अटक केली.
- २००६ ते २०१३ या कालावधीतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात २०१८मध्ये एफआयआर नोंदवल्यापासून म्हाडा पक्षकार आहे आणि म्हाडामधील संबंधित कर्मचाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद असूनही ईडीने कोणालाही आरोपी केले नाही.
- मुख्य आरोपी बिल्डर राकेश व सारंग वाधवान यांनी या प्रकरणात आपली चुकीची कृत्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातच मान्य केलेली आहेत. त्यांना अन्य अनेक प्रकरणांत ईडीने अटक केली. मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी असूनही अटकच केली नाही. यातून ईडीच्या कारवाईतील असमानता सुस्पष्ट दिसते.
- दिवंगत मुख्यमंत्री विलास देशमुख व तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली, असे ईडीकडे जबाब नोंदवणाऱ्या चंदन केळेकर यांना विशिष्ट गोष्टी ‘फोटोग्राफिक मेमरी’प्रमाणे आठवल्या; पण इतर अनेक बाबी आठवल्या नाहीत.
- जर न्यायालयानं प्रवीण आणि संजय राऊतांचा जामीन नाकारला तर प्रामाणिक आणि निष्पाप लोकांचा न्यायालयावरचा विश्वासच उडेल. त्यामुळं न्यायालयाच्या मते दोन्ही आरोपींना झालेली अटक ही बेकायदा आहे.
मुक्तपीठ विश्लेषण
एकूणच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आता पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असं म्हटलं असलं तरी ते आता तेवढेसे सोपे नसणार. आदित्य ठाकरे म्हणाले तसं, आता शिवसेनेची तोफ मैदानात परतली आहे! अर्थात याचा अर्थ भाजपाविरोधी नेत्यांविरोधात आता केंद्रीय यंत्रणा राजकीय कारणांमुळे कारवाई करणार नाहीत, असंही नाही.