मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं खोकेकरण झाल्याची टीका होत असते. अकोला रेल्वे स्थानकावर जे काही घडलं ते शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांसाठी धोक्याचा इशारा देणारंच आहे. खोके-ओकेपासून गद्दारपर्यंतच्या घोषणांनी अकोला स्थानक दणाणून गेलं…तेही शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळींसमोरच…
शिवसेना सचिव विनायक राऊत अकोला दौऱ्यावर होते. तेथून ते परतताना त्यांना निरोप देण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. तेवढ्यात तिच गाडी पकडण्यासाठी खासदार भावना गवळी तेथे आल्या आणि मग ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळी दिसताच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केल्यात.
नेमकं काय घडलं?
- विदर्भ एक्सप्रेसने अकोला रेल्वे स्थानकावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले.
- यावेळी भावना गवळी दिसताच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार तसेच ५० खोके एकदम ओके अशा घोषणा करण्यात आल्या.
- यादरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ पाहायला मिळाला.
- यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कराळेसह आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
असं पहिल्यांदाच घडलं असं नाही. रायगडमधील महाडमध्ये आदित्य ठाकरे गेले असताना त्यांनी तुमचे आमदार कोण, असा प्रश्न विचारला, तेव्हा उपस्थितांनी आमदार भरत गोगावलेंचं नाव न घेता काय म्हटलं ते मुक्तपीठनं याआधीच दाखवलेल.
सत्ता हेच सत्य नसतं हेच अकोल्यातील घटनेतून दिसून आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाशक्ती म्हणाले, त्या भाजपाच्या आश्रयाला गेले, महाराष्ट्रात सत्तेत आहेत, तरीही शिंदे गटाच्या आमदार, खासदारांना जनप्रक्षोभाचा सामना करावा लागतोय. पण त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेनेही फक्त घोषणाबाजीलाच बहादुरी न समजता सामान्यांसाठी सामाजिक कार्यावर भर द्यावा लागेल, नाही तर घोषणांच्या वाफा संपल्यावर पुढे काय, असा प्रश्न पडेल.