मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आयसीएसच्या बारावीच्या परीक्षा सध्या स्थगित केल्या आहेत. त्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. सीबीएसई, आयसीएसईनंतर आता तरी महाराष्ट्र सरकार दहावीच्या परीक्षा रद्द करणार का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
सीबीएसई बोर्डांनंतर आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विविध स्तरावरून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदा दहावीची परीक्षा रद्द तर १२ वीची परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेण्यात आला. हा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केला.
केंद्रीय आणि इतर काही राज्यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना महाराष्ट्राचे शिक्षण खाते मात्र परीक्षा पुढे ढकलून गप्प बसले आहे. ते आता तरी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा रद्द करत नाही, असा सवाल विचारला जात आहे.