सरकार करेल, कुणी तरी येईल आणि आपलं काम करेल, असं काही न करता गावकरी एकवटले आणि त्यांनी नदीवर स्वत:च पूल बांधला. ही प्रेरणादायी चांगली बातमी यवतमाळच्या पळशी आणि नांदेडच्या मनुला गावातील आहे. पळशी गाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये तर मनुला नांदेडमध्ये आहे. तिथं पैनगंगा नदी वर पूल नव्हता. नदी ओलांडताना गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. विशेषत: दरवर्षी पावसाळ्यात ही अडचण जास्त होत होती. तिथल्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वारंवार मागणी करुनही ते दुर्लक्ष करत होते. शेवटी पळशी आणि मनुलाच्या गावकऱ्यांनी स्वखर्चाने हा पूल ९ दिवसात बांधला.
पळशी – मनूला गावांमध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. पूर्वी विदर्भातील लोकांना ३५ किलो मीटर अंतराचा फेरा मारून मराठवाड्यात जावे लागत होते. यामुळे वेळ आणि पैसा व्यर्थ खर्च होत होता. फेरा कमी करण्यासाठी लोक एकत्र आले. अगदी ९ दिवसात लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा पूल बांधण्यात आला. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने कमी वेळात मराठवाड्यात जाता येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.
७० फूट लांबीचा पालसी-मनुला पूल १६ फूट रुंद आहे. उमरखेड तहसीलमधील पळशी, पोफळी, कुप्ती आणि मुलावा या गावांमध्ये आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मनुला, माथाळा आणि सिराड येथील ग्रामस्थांसाठी हा पूल वरदान ठरणार आहे. यापूर्वी या पुलासाठी ग्रामस्थ आमदार, खासदार, महाराष्ट्रातील मंत्री, जिल्हाधिकारी आणि सरकारी विभागातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला होते. तथापि, त्यांच्या मागणीकडे ते दुर्लक्षच करत राहिले.
यापूर्वी तीन छोटे पूल बांधण्यात सहभागी असलेले यवतमाळ जिल्हा परिषदेचे सभासद चितांगराव कदम यांनी गावकऱ्यांना हा पूल स्वत: बांधण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी पुढाकार घेऊन रहीवाशांकडून १६ लाख रुपये जमा केले. गावकऱ्यांनी नुसती पैशाची मदत न करता, या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची व्यवस्थाही केली. बेस स्ट्रक्चर म्हणून आरसीसी पाईप्सचा वापर करून, ग्रामस्थांनी गवंड्यांच्या सहकार्याने अवघ्या ९ दिवसात हा पूल बांधला.
राज्य सरकारच्या अंदाजानुसार १ कोटी रुपयांवर खर्च आला असता. पण गावकऱ्यांनी हे काम केवळ १५.८० लाख रुपये खर्चात पूर्ण करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, हिंगोलीचे विद्यमान शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, उमरखेडचे भाजप आमदार नामदेवराव ससाणे आणि हातगावचे काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि सरकारी अधिकारी व इतरांनी पुलाला भेट देऊन गावकऱ्यांचे कौतुक केले.
लिंक क्लिक करा आणि पाहा: https://www.youtube.com/watch?v=_2CiSeD4KM8