मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहाण्यासाठी आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू होणार आहे. भारत सरकारने ही माहिती नुकतीच दिली आहे. देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता १२ ते १४ वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र या आठवड्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरू करेल. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यासाठी सहविकार कलम काढून टाकले जाईल. म्हणजेच, आता सर्व ज्येष्ठ नागरिक प्रतिबंधात्मक डोससाठी पात्र असतील.
याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करूत लिहिले की, “मुले सुरक्षित असतील तरच, देश सुरक्षित आहे! मला हे कळविण्यात आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू होत आहे. तसेच, ६०+ वर्ष वयोगटातील प्रत्येकजण आता बुस्टर डोस मिळवण्यास सक्षम असतील. मी लहान मुलांचे कुटुंब आणि ६०+ वयोगटातील लोकांना लस घेण्याची विनंती करतो.” असे ते म्हणाले.
बारा वर्षांवरील वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस
- लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपने हैदराबादस्थित ‘बायोलॉजिकल ई’ ला १२ ते १४ वयोगटातील लोकांना कॉर्बेव्हॅक्स लस देण्याची शिफारस केली आहे.
- यामुळेच भारतातील १२ ते १४ वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स ई ची लस दिली जाईल.
- भारताने ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे.
- आतापर्यंत मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३,३७,७०,६०५ मुलांना दुसरा डोस मिळाला आहे.