मुक्तपीठ टीम
लसीकरण प्रमाणपत्र सध्या अनेक ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे ते मिळवायचे कसे असा प्रश्न अनेकांना सतावतो. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या को-विन अॅपर ते मिळतेच, पण त्याहीपेक्षा सोपी पद्धत आज तुम्हाला सांगत आहोत. त्यासाठी जास्त काही करायचं नाही. फक्त व्हॉट्सअॅपवर एका नंबरला मॅसेज पाठवायचे आणि लसीकरण प्रमाणपत्र हजर!
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कोरोना महामारी विरूद्धच्या युद्धात खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. याद्वारे, कोठूनही मित्र, व्यावसायिक सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांच्या सतत संपर्कात राहता येते. आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते कोरोना लसीचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील. यासाठी व्हॉट्सअॅपने भारत सरकारच्या केंद्र सरकारसोबत भागीदारी केली आहे.
व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमुळे लसवंतांना त्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करणे सोपे होईल. तसेच त्यांचा वेळही वाचेल. आतापर्यंत लोकांना लसीचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी कोविन वेबसाइट किंवा आरोग्य सेतू अॅपवर लॉग इन करावे लागत होते. पण आता हे काम माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे करता येईल. त्यामुळे आता जराही वेळ घालवू नका, मोबाइल उचला, व्हॉट्सअॅप करा आणि लसीकरण प्रमाणपत्र मिळवा.
व्हॉट्सअॅपवर लसीकरण प्रमाणपत्र कसं मिळवाल?
- वापरकर्त्यांना माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप चॅटबॉट वापरावा लागेल.
- यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये +91 9013151515 क्रमांक सेव्ह करावा लागेल.
- यानंतर व्हॉट्सअॅपवर जाऊन या नंबरवर मेसेज करावा लागेल.
- लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी, चॅटमध्ये “डाउनलोड सर्टिफिकेट” लिहून पाठवा.
- यानंतर चॅटबॉट नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 6 अंकी ओटीपी पाठवेल.
- एकदा ओटीपी मिळाला की तो चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा.
- ओटीपी पाठवल्यावर, आपल्याला नाव आणि मोबाईल नंबरसह एक मेसेज येईल.
- लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ‘1’ टाइप करण्यास सांगितले जाईल.
- 1 पाठवल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल, जे तुम्ही डाउनलोड करू शकता.