मुक्तपीठ टीम
अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात आला आहे. अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. या ऑपरेशनची महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही स्फोटाविना आणि अन्य कोणालाही इजा न होता अल-जवाहिरीची हत्या करण्यात आली. अमेरिकेने यासाठी त्यांच्या सर्वात धोकादायक निंजा मिसाईलचा वापर केला. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए गेल्या अनेक आठवड्यांपासून काबूलमध्ये बसलेल्या अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीवर नजर ठेवून होती. व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये बसलेले अधिकारी त्याच्या प्रत्येक हालचालीच्या अहवालाचा अभ्यास करत होते. ते फक्त संधी शोधत होते.
सोमवारी हा अल-जवाहिरीचा शेवटचा दिवस असेल, असे अमेरिकेने आधीच ठरवले होते. म्हणूनच व्हाईट हाऊसने सोमवारी दुपारी जाहीर केले की जो बायडेन संध्याकाळी “एक यशस्वी-दहशतवाद विरोधी ऑपरेशन” बद्दल राष्ट्राला संबोधित करतील, परंतु व्हाईट हाऊसने कोणाचेही नाव घेतले नाही. सायंकाळपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी केली.
शिपूर भागात अल-जवाहिरी मारला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. हा तोच भाग आहे जिथे अमेरिकेने अफगाणिस्तानात लष्करी छावणी बांधली होती. तालिबान सत्तेवर आल्यावर अमेरिकेने सुमारे एक वर्षापूर्वी कॅम्प रिकामा केला होता.
R9X मिसाईल आहे तरी काय?
आतापर्यंत अल-जवाहिरीच्या मृत्यूचे फोटो बाहेर आलेले नाही. असे असूनही सीआयएने हे अभियान पार पाडले. वास्तविक अमेरिकेने ड्रोन हल्ल्यासाठी आपल्या धोकादायक हेलफायर R9X मिसाईलचा वापर केला. या क्षेपणास्त्राचा इतर क्षेपणास्त्रांप्रमाणे स्फोट होत नाही. त्याऐवजी, चाकूसारखे ब्लेड आतून बाहेर पडतात, जे लक्ष्यावर अचूकपणे लक्ष्य करतात. हेलफायर मशिन अत्यंत घातक आणि केवळ लक्ष्यावर अचूक असल्याचे ओळखले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कोणतीही इजा होत नाही. जो बायडेन यांनी आपल्या भाषणात असेही सांगितले की अचूक हल्ल्यात जवाहिरीच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही नागरिकांना इजा झाली नाही.