मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री गिरीश चंद्र यादव यांच्याबाबतीत एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान रात्री झोपलेले असताना त्यांना उंदरानं दंश केला मात्र आपल्याला सर्पदंश झाल्याच्या भीतीने त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपाचारानंतर साप नव्हे तर उंदिरानं दंश केल्याचं उघडकीस आलं.
जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक (सीएमएस) डॉ. एस.एन. मिश्रा यांनी सांगितले की, बांदा येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले क्रीडामंत्री गिरीशचंद्र यादव मवई बायपास येथे सर्किट हाऊसमध्ये रात्री मु्क्कामाला थांबले होते. रात्री उशिरा तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला कोणत्यातरी प्राण्याने चावा घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉ.मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, आजूबाजूला जंगल असल्याने मंत्र्यांना साप चावला असल्याचा संशय आला. या दहशतीत त्यांची प्रकृती बिघडली. मंत्री महोदयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांना साप चावला नसून उंदराने चावल्याचे तपासात आढळून आले.
सीएमएसच्या म्हणण्यानुसार, साप चावला नसल्याची पुष्टी झाल्यानंतर मंत्र्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्री आता पूर्णपणे निरोगी असून ते सोमवारी सकाळी लखनौला रवाना झाले.