मुक्तपीठ टीम
अतिवृष्टी, पूर, वादळ…त्यानंतर अवकाळी पावसांचा वारंवार बसणारा फटका. वर्ष सरायला आलेलं असतानाही शेतीवर आलेल्या संकटांची मालिका काही सरलेली नाही. एकीकडे कडाक्याची थंडी पडलेली असताना मराठवाडा, विदर्भाला आणि राज्यातील इतरही अनेक ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. राज्याच्या काही भागात पावसाने अवेळी हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
जालना
- जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.
- अंबड आणि भोकरदन तालुक्यात वादळी पावसासह गारपीट झाली.
- अंबड तालुक्यातील दूनगाव,बारसवाडा, सिरसगाव येथे जोरदार पाऊस आणि गारा बरसल्या.
- भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे गारा आणि वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
- मका,गहू, ज्वारी,हरभरा या सह फळपिकांच मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
- जाफराबाद तालुक्यातही पावसाचा जोर होता.
- तीर्थपुरी गावाच्या परिसरातही अवकाळी पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारा पडल्या.
- जालना शहर तालुक्यासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.
औरंगाबाद
- जिल्ह्यातील पैठण, पाचोड, गंगापूर, वैजापूर आदी परिसरात वादळी वारा, पाऊस आणि कुठे कुठे तर गारपीटीनेच झोडपलं. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं.
- पैठण तालुक्यातील इसारवाडी, धनगाव, वाहेगव, लोहगावमध्ये वादळी वाऱ्यासह १५ ते २० मिनिटे जोरदार गारपीट झाली.
- या भागात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.
- गंगापूर शहर आणि परिसरात, तसेच वैजापूरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
- त्यामुळे नव्याने लागवड होत असलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले.
- हरभरा, ज्वारीसह रबीच्या पिकांनाही फटका बसला.
पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह २० मिनिटे गारपीट झाली. गंगापूरलाही याचा तडाखा बसला.
वैजापूर तालुक्यात गंगथडी पिकांसह मेंढपाळही गारपिटीत झोडपून निघाले. द्राक्षांच्या फळबागांना तडाखा बसला, कोवळ्या कांद्यांचे रोप खराब झाले.
अकोला
- अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पश्चिम वऱ्हाडात रब्बी हंगामातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
- काही ठिकाणी हाती आलेले सोयाबीन पाण्यात भिजले आहे.
- काढणीला आलेल्या तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.
- हरभरा, गहू, कांदा व भाजीपाला या पिकांचे देखील नुकसान झाले.
- रब्बी हंगामातील पिके, फळबागा आदींना गारपिटीचा जबर मार लागला.
- विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेला मालदेखील पावसाच्या पाण्याने भिजला.
- अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान केल्याने शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटाने भरडला गेला आहे.
नागपूर
- जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड तालुक्यात गारांसह पाऊस झाला. मोहपा, वाढोना व मेंढला परिसरात गारपीट झाली.
यवतमाळ
- जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्याला गारपिटीने झोडपले. गणोरी, बाभूळगाव शहर, आसेगाव राणी अमरावती आणि जवळपासच्या तालुक्यात गारा पडल्या.
- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे सुटले. त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.
- बाभुळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, बाभुळगाव, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापुर, नागरगाव, पंचगव्हाण, चिमणापूर, पिंपरी(इजारा), इंदिरानगर, नांदुरा खुर्द, मालापुर या गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला.
- नेर तालुक्यातील चिखली (कान्होबा) पिंपरी, कलगाव आणि कळंब तालुक्यातील सावरगाव ताले गाव पिंपळखुटी या गावांमध्येही जोरदार अवकाळी पाऊस पडला.
- या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा व तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले.
हिंगोली
- गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
- अवेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून गारपीटीच्या धास्तीने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.
अहमदनगर
- श्रीरामपूर तालुक्यात गोदाकाठी पूर्व परिसरातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला. यामुळे पिकांचे नुकसान झाले. पावसासोबत गाराही पडू लागल्या.