मुक्तपीठ टीम
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. याच दरम्यान, भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) निर्मित ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी डोस ब्रिटनमध्ये पाठविले जाणार असल्याची माहिती ब्रिटन सरकराने एका वृत्त संस्थेला दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. जी गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत अॅस्ट्रॅजेनेका ही लस उत्पादन करत आहे. वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी सीमरमधील उत्पादन प्रक्रियेची चाचणी करत होती, जेणे करुन अॅस्ट्रॅजेनेका लसीला ब्रिटनमध्ये पाठविण्याचा मार्ग मोकळा होईल.
यावरून असे सिद्ध होते की, पश्चिमेकडील श्रीमंत देश मोठ्या प्रमाणात लसीचा साठा खरेदी करत आहेत. बांगलादेश ते ब्राझीलपर्यंतचे कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील एक समूह पूर्णपणे सीरमच्या अॅस्ट्रॉजेनेका आणि कोव्हिशिल्ड लसीवर अवलंबून आहे, परंतु पाश्चात्य देशांकडून लसीची मागणी वाढत असल्याचे दिसत आहे.
यावर ब्रिटन सरकारने म्हटले की, “करारानुसार एसआयआयकडून त्यांच्या आश्वासनाचे पालन केले जाते आहे. पण यामुळे गरीब देशांपर्यंत लस पोहचवण्याच्या बांधिलकीवर परिणाम होणार नाही”.