मुक्तपीठ टीम
मुंबईसह पाठोपाठ ठाणे मनपाचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला. एकूण ३ हजार २९९ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. दरम्यान मनपा अर्थसंकल्प सादरीकरणात अर्थसंकल्प सादरीकरणात गोंधळ पाहायला मिळाला. ठाणे मनपाचं ऑनलाइन अर्थसंकल्प सादरीकरण आणि अर्थसंकल्पाची कॉपीदेखील आधी पूरवली नसल्याने काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप नेत्यांकडून आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४५ कोटींनी अर्थसंकल्प वाढला
- दरम्यान, ठाणे महानगर पालिकेनं २०२२-२३ चा ३ हजार २९९ कोटींचा मूळ अर्थसंकल्प आज आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला.
- ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज सादर केला.
- कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नसलेला वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंकल्प हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय आहे.
- यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार तब्बल ५४५ कोटींनी वाढल्याचं दिसून येत आहे.
- गेल्या वर्षी २ हजार ७५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
पुरेशी पार्किंग सुविधा
शहरात पुरेशी पार्किंग सुविधा निर्माण करता यावी यासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
ठाण्यात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा मनपाचा मानस
- ठाणे शहरात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- त्यासाठी सदर २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी मनपाचे पाऊल…
- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत हवा प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढणे यासाठी ४८ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
- त्यातून ठाणे मनपा परिवहन सेवेकरीता ८१ इलेक्ट्रीक बसेसची खरेदी, वागळे इस्टेट स्मशानभूमीमध्ये PNG शवदाहिनी बांधणे, Dust Sweeping मशीन खरेदी करणे, पालापाचोळा कचरा व्यवस्थापनासाठी Horticulture Composting Plant उभारणे, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी Mist spray machine उभारणी करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.