मुक्तपीठ टीम
औरंगाबादमध्ये सायकलप्रेमींना स्वतंत्र ट्रॅक तयार करून देण्यात येत आहेत. औरंगाबादमध्ये पहिल्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन हल्लीच करण्यात आले आहे. त्यावेळी एका प्रयावरणपूरक योजनेची घोषणा करण्यात आली. आता शहरातील इतर चार सायकल ट्रॅक हे वापरलेल्या टायर्सचा पुनर्वापर करून बांधण्यात येणार आहेत. हे सायकल ट्रॅक फक्त स्वस्तच नसून पर्यावरणपूरक देखील आहेत.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एएससीडीसीएलचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्काळ शिवम यांच्या माहितीनुसार, उर्वरित ट्रॅकचे बांधकाम हे मलबा आणि टायरचा पुनर्वापर करून बांधण्यात येणार आहेत.
क्रांतीचौक ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पहिल्या सायकल ट्रॅकचे नुकतेच औपचारिकरित्या उद्घाटन झाले आहे. त्यानंतर सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉईंट, हर्सूल टी-पॉइंट ते दिल्ली गेट, दिल्ली गेट ते बिबी का मकबरा, हॉटेल ताज ते सेव्हेन हिल्स वाया सेंट्रल नाका आणि क्रांती चौक ते विमानतळ असे इतर सायकल ट्रॅक शहरात अस्तित्वात येतील.
एएससीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ट्रॅकचा एकूण खर्च पाच कोटी रुपये होता, परंतु आता ते कमी खर्चात बांधले जात आहेत. “जुन्या टायर्सचा आणि मलबाच्या वापराने बांधकामाचा एकूण खर्च कमी होईल. सर्व योजनांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त बचत होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.”
औरंगाबाद पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी अशा प्रकारच्या सायकल ट्रॅकचे नियोजन करणे गरजेचे आहे. “सिडको बसस्थानक व हर्सूल टी-पॉईंट दरम्यान लवकरच सायकल ट्रॅकचे बांधकाम सुरू करण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर ट्रॅकही बांधले जातील.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सायकल चेंज चॅलेंजचा भाग म्हणून एएससीडीसीएलने शहरातील २० किमी सायकल ट्रॅक तयार करण्याचा संकल्प केला आहे.
पाहा व्हिडीओ: