राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने (एससी-एनबीडब्ल्यूएल) ५ जानेवारी रोजी झालेल्या ६० व्या बैठकीत देशातील मानव-वन्यजीव संघर्ष (एचडब्ल्यूसी) व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली. मानव-वन्यजीव संघर्षाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तसेच आंतर-विभागीय समन्वित आणि प्रभावी कृती करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांकरिता या मार्गदर्शक सूचनांमध्ये महत्वपूर्ण नियम करण्यात आले आहेत.
वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या कलम ११ (१) (b) नुसार वन्य प्राण्यांशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी ग्रामपंचायतींच्या सशक्तीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. मानव-वन्यजीव संघर्षामुळे होणाऱ्या पीक नुकसान भरपाईसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अधिकची भरपाई मिळविणे आणि वनक्षेत्रात चारा आणि पाण्याचे स्त्रोत वाढविणे या मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आहेत. घटनेनंतर पीडित व्यक्ती / कुटूंबाला २४ तासांच्या आत तात्पुरता दिलासा भरपाईची काही रक्कम मिळावी.
या बैठकीत घेण्यात आलेला दुसरा निर्णय म्हणजे ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील वाशी येथे काही विशिष्ट उपाययोजनांद्वारे एकात्मिक बस थांबा युक्त व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे बांधकाम. पुनर्विकास सुविधेमुळे १७ बस मार्गांसाठी मार्ग मोकळा होणार असून अंदाजे ३ हजार ३०० बस फेऱ्या कार्यान्वित होतील, ज्यामुळे मुंबई व आसपासच्या लोकांना वाहतुकीच्या दृष्टीने मोठा फायदा होईल.