मुक्तपीठ टीम
जगात आज महिलांचं स्थान हे पुरुषांच्या बरोबरीचं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला या सर्वोच्च पदी आहेत. मुलगी शिकली,प्रगती झाली असा सुविचार शाळेवरच्या फळ्यावर तर भरपूर वेळा लिहिला जातो. मात्र पुरोगामी आणि बुरसटलेल्या विचारांच्या लोकांमुळे अंधश्रद्धांचं महत्व वाढतं. नाशिक येथील आश्रम शाळेत एका मुलीला मासिक पाळी आल्याने तिला वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आले. झाड लावले तर ते जळून जाईल, असे म्हणत शिक्षकांनीच विद्यार्थिनीला वृक्षारोपण करू दिले नाही. संबंधित विद्यार्थिनीने नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांची भेट संपूर्ण घेटनेची माहिती दिली. या मुलीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
- देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेने गेल्या आठवड्यात वृक्षारोपण अभियान राबवले.
- त्यावेळी शाळेच्या एका शिक्षकाने, ‘ज्या विद्यार्थिनीला मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेले झाड जगणार नाही, असे सांगितले.
- विशेष म्हणजे आपले हे अजब तत्त्वज्ञान त्यांनी १२ वी विज्ञानशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ऐकवले आणि तिला झाडाचे रोप लावण्यास मनाई केली.
- याबाबत या विद्यार्थिनीने रविवारी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान मधे यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला.
- मधे यांनी तातडीने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला.
- मात्र, त्यानंतरही शासन यंत्रणा हालली नाही.
- अखेर मंगळवारी संबंधित मुलीने मंगळवारी थेट अप्पर आयुक्त यांची भेट घेत घडलेला प्रकार कथन केला.
पीडित विद्यार्थिनीची संबंधित शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी…
- मासिक पाळी सुरू असेल, त्या विद्यार्थिनीने झाड लावू नये. नाही तर हे झाड जळून जाईल’… असे शिक्षकाने सांगितले.
- यानंतर मी शिक्षकांना थेट जाब विचारला.
- परंतु, शिक्षकांनी मलाच दटावले आणि बाहेर काढून दिले.
- त्यामुळे या प्रकाराबाबत थेट आदिवासी आयुक्तांकडेच तक्रार केली आहे.
- सदरचा प्रकार अयोग्य असून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी.
हा प्रकार निंदनीय, भगवान मधे
- मुलींना साक्षर करीत आदिवासी समाजाची उन्नती साधण्यासाठी आश्रमशाळांची आखणी करण्यात आली आहे.
- मात्र, त्याच शाळांमधून अद्यापही मध्ययुगीन बुरसटलेल्या विचारांचे पाठ दिले जात आहेत.
- हा प्रकार निंदनीय आहे, असे मधे यांनी सांगितले.