मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयात उद्योगपती रतन टाटा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साररस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवण्याच्या त्यांच्या निर्णयावर सर्वोच्च शिक्कामोर्तबाच्या बातम्या आल्या. पण त्यात सर्वात महत्वाचे ठरले न्यायालयाचे निरीक्षण. न्यायाधीश म्हणालेत, “‘टाटांचा सायरस मिस्त्रींना नेमण्याचा निर्णय चुकलाच.” न्यायालयाच्या या निकालानंतर अनेकांना आठवला तो दिवस आणि त्या दिवसाचे टाटांनी उधळलेली कौतुकाची स्तुतीसुमने….
“मी सायरस मिस्त्रीच्या गुणांमुळे, त्यांची क्षमता, तीक्ष्णता आणि नम्रतेने प्रभावित आहे.” हेच ते शब्द आणि २३ नोव्हेंबर २०११ हाच तो दिवस, ज्या दिवशी उद्योगपती रतन टाटा यांनी सायरस मिस्त्रींचे कौतुक केले होते. बराच शोध घेतल्यावर निवृत्ती घेत असलेल्या टाटांना वारस मिळाला, ती घोषित केल्याची ही तारीख होती. टाटा सन्समध्ये १८ टक्के म्हणजेच सर्वाधिक हिस्सा असलेल्या शापूरजी पालनजी घराण्यातील ४३ वर्षीय सायरस मिस्त्री यांना टाटांनी वारसदार म्हणून निवडले होते.
परंतु तो निर्णय टाटांसाठी चुकीचा ठरला, हे आता सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यास देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने योग्य ठरवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शापुरजी पालनजी ग्रुप कंपन्यांनी रतन टाटा यांना शॅडो डायरेक्टर म्हणणे योग्य नाही.
कोर्टाने एनसीएलएटीच्या १८ डिसेंबर २०१९ च्या आदेशाला रद्द केले, ज्यानुसार टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.
सायरस मिस्त्री यांच्यावरील निकालानंतर रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून असे सिद्ध होते की, टाटा सन्स नेहमीच आपल्या तत्त्वांनुसार आणि मूल्यांसोबत उभी राहते.
ट्विटमध्ये रतन टाटा यांनी असेही लिहिले आहे की, हा निकाल आपल्या न्यायपालिकेची निष्पक्षता आणि पारदर्शकता दर्शवते.