मुक्तपीठ टीम
देशात दुसरी लाट ही गंभीर झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णाची नोंद होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोना केंद्रांतील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे नवीन केंद्र उभारणीचे सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू असताना, अंधेरीतून एका मोठ्या मनाच्या अधिकाऱ्याचा मदतीचा हात पुढे आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या अधिकाऱ्याने आपला राहता बंगला आणि इन्स्टिट्यूटचे मुलामुलींचे हॉस्टेल कोरोना केंद्रासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पालिकेला तब्बल २०० बेड्सचे कोरोना केंद्र येथे उभारणे शक्य झाले आहे.
तन्वीर आलम यांनी बंगला देण्याची तयारी दाखवली-
- अंधेरी पूर्व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
- पालिकेची रुग्णालये, सेव्हन हिल रुग्णालये, कोरोना केंद्रांमध्ये रुग्णांची व्यवस्था केल्यानंतरही वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणखी जागेची गरज भासत आहे.
- या पार्श्वभूमीवर जागांच्या शोधात असताना अंधेरी एमआयडीसी परिसरात केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगकडे पालिकेने जागा देण्याची विनंती केली.
- इन्स्टिट्यूटचे अधिकारी तन्वीर आलम यांनी जागा देण्याचे मान्य केले.
- एमआयडीसीतील हा भाग झाडाझुडपांनी वेढलेला असून अतिशय रम्य परिसर म्हणून ओळखला जातो.
- इन्स्टिट्यूटच्या आवारात मुलामुलींची प्रत्येकी पाच मजली दोन स्वतंत्र हॉस्टेलच्या इमारती आहे.
- लॉकडाउनमुळे सध्या त्याचा वापर होत नाही.
- या हॉस्टेल इमारतींचे तसेच अधिकाऱ्याच्या बंगल्याचे कोरोना केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे.
- अधिकाऱ्याला हॉस्टेलच्या इमारतींविषयी विचारणा केली असता त्यांनी आपला राहता बंगला देखील देण्याची तयारी दाखवली.