मुक्तपीठ टीम
मुंबईतील रस्त्यांचा प्रश्न हा खूपच महत्वाचा आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसासोबत सुरू होते. दरवर्षी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही खड्ड्यांची डोकेदुखी कायम आहे. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांसह सर्वसामान्यांच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या मुंबई मनपाने आता मुंबईत मजबूत आणि टिकाऊ रस्ते बांधण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत ५०५ रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे, ज्यावर मुंबई मनपा २ हजार २१० कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहे. त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुंबई मनपा तांत्रिक सल्लागार समितीची मदत घेईल. या रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी रस्तेबांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई मनपाची टिकाऊ रस्त्यांची योजना
- मुंबईत ५०५ पैकी २९५ रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे.
- येत्या दोन वर्षांत २१० रस्ते पूर्ण होणार आहेत
- हे सर्व रस्ते तयार झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.
५ हजार ८०० कोटी रुपयांची निविदा
- मुंबईतील ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामासाठी मुंबई मनपाने नुकतीच ५ हजार ८०० कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
- रस्ते सुधारण्यासाठी मनपाने कंत्राटदारांसोबत नवीन जीवन धोरण तयार केले आहे, याअंतर्गत कंत्राटदारांना १० वर्षे रस्त्यांची देखभाल करावी लागणार आहे.
- मुंबईतील ४०० किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या प्रस्तावित कामांपैकी यंदा मुंबई शहरातील ५० किमीचे रस्ते पूर्व उपनगरातील ७५ किमी आणि पश्चिम उपनगरात २७५ किमी लांबीचे रस्ते सिमेंटीकरण करण्यात येणार आहेत.
मुंबई मनपाचे २०२२-२०२३मधील रस्ते बांधणीचे लक्ष्य
- २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीचे रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटने व्यवस्थित करण्याचे लक्ष्य आहे.
- यावर्षी इतर ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम प्रस्तावित आहे.
- २०२३-२०२४ मध्ये उर्वरित ४२३.५१ किमी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे लक्ष्य आहे.
- मुंबईत २०५५ किमी लांबीचे रस्ते आहेत. १ हजार किमी लांबीचे रस्ते सिमेंटीकरण करण्यात आले आहेत. येत्या दोन वर्षांत सर्व रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे नियोजन आहे.