मुक्तपीठ टीम
एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा १४ वा दिवस आहे. राज्यभरातील शंभर टक्के एसटी बसेस बंद असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे संपकऱ्यांबद्दल ताठर भूमिका घेणाऱ्या सरकारने खासगी वडाप वाहतूकदारांना एसटीसारखी प्रवाशी वाहतुकीची अधिकृत परवानगी दिल्याने काही ठिकाणी वेगळी लूट सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजारपणातही एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळ मात्र समन्वयाऐवजी संप चिरडण्याच्या भूमिकेत दिसत आहे. बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९१८ झाली आहे.
महाराष्ट्रभर दडपशाहीचा वरवंटा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानदुखीने बेजार आहेत.
- तरीही रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले.
- पण त्यानंतर समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी एसटी महामंडळाने ताठरपणाचीच भूमिका कायम ठेवली आहे.
रात्रभर कर्मचारी रस्त्यावर!
- मुंबईतील परळ, मुंबई सेन्ट्रल, परळ आगारातील एसटीच्या चालक-वाहकांना मंगळवारी रात्री विश्रामकक्षातून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून कक्षांना कुलूप लावल्याचा प्रकार घडला.
- हीच कारवाई महानगरातील अन्य आगारांतही झाली.
- त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या साहित्यासह पदपथावरच रात्र काढावी लागल्याचे एका वाहकाने सांगितले.
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांविरोधातील कारवाई बुधवारी आणखी वाढवण्यात आली आहे.
- बुधवारी ६४ आगारांतील ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
- त्यामुळे दोन दिवसांत निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९१८ झाली आहे.
- सांगली विभागातील जत, पलूस, इस्लामपूर, आटपाडी या आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये सांगली विभागातील इस्लामपूर आणि आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. - नागपूर आणि यवतमाळ विभागातील विविध आगारांतील प्रत्येकी ४६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उचलण्यात आला.
नाशिक विभागातीलही ४० कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. - अन्य विभागांतही विविध कारवाया झाल्याचे महामंडळाने सांगितले.
पर्यायी व्यवस्था, पण लूटही!
- खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक
- प्रवाशांच्या सुविधेसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खासगी बस, शालेय बस आणि अन्य वाहने चालवण्यात येत आहेत.
- सुमारे २ हजार १०२ पैकी ६३८ खासगी बस, तर १५९ शालेय बसची सेवा देताना उर्वरित अन्य वाहने असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
- दरम्यान, राज्यातील एसटी सेवा ठप्प असल्याने महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने आगारातून खासगी प्रवासी बसगाड्या, शालेय बस आणि अन्य खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू ठेवली.
- मात्र, यापैकी अनेक खासगी वाहतूकदार लूट करत असल्याच्या तक्रारी येत आहेत.