मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकलेले असतानाच घडलेली एक घटना आश्चर्य निर्माण करणारी आहे. तीन रशियन अंतराळवीर पृथ्वीवरून नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पोहचले आहेत. त्या अंतराळवीरांनी कझाकस्तानमधील बॅकोनर प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण केले आणि नियुक्त कक्षेत सुरक्षितपणे पोहोचले. ज्या रशियन अंतराळवीरांनी उड्डाण केले त्यांची नावे आलेग अर्तेमयेव, डेनिस मॅतवेयेव्ह आणि सर्गेई कोरसाकोव्ह अशी आहेत. सोयुझ एमएस-२१ रॉकेटने प्रवास करत हे तीन रशियन अंतराळवीर आयएसएसवर पोहोचले. पण त्यांच्या स्पेससुटचे रंग पाहून इतर देशांच्या अंतराळवीरांना धक्काच बसला.
रशियन अंतराळ एजन्सी रॉस्कोस्मोसने दिलेल्या माहितीनुसार तिन्ही अंतराळवीरांनी यशस्वीरित्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर ते स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले. गेल्या महिन्यात, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाने युक्रेनमध्ये युद्ध पुकारल्यानंतर मॉस्कोच्या एरोस्पेस उद्योगाला लक्ष्य करत निर्बंधांची घोषणा केली. अशा परिस्थितीत रशियाच्या या मोहिमेकडे खास लक्ष होते.
रॉस्कोस्मोसचे प्रमुख रोगोझिन यांनी ट्विट करत लिहिले की, रशियातून प्रथमच संपूर्ण रशियन क्रू अंतराळात पोहोचला आहे. या कामात अमेरिकेच्या मदतीची गरज होती. तर आयएसएसमधील प्रोपल्शन आणि अॅटीट्यूड रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. १९९० च्या दशकात स्पेस स्टेशन स्थापन झाल्यापासून दोन्ही देश एकमेकांवर अवलंबून आहेत. अंतराळ स्थानक कक्षेत राहण्यासाठी रशियाची मदत आवश्यक असते.
स्पेस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या रशियन अंतराळवीरांचे स्पेस सूट लक्षवेधी
- जेव्हा तीन रशियन अंतराळवीर आलेग अर्तेमयेव, डेनिस मॅतवेयेव्ह आणि सर्गेई कोरसाकोव्ह आयएसएसवर पोहोचले, तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेले अमेरिकन, रशियन आणि जर्मन अंतराळवीर थक्क झाले.
- तिन्ही रशियन अंतराळवीर पिवळ्या आणि निळ्या स्पेस सूटमध्ये होते. हा युक्रेनच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे.
- युक्रेन युद्धादरम्यान आयएसएसपर्यंत पोहोचलेल्या या अंतराळवीरांना पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
- तीन तासांच्या आरामदायी प्रवासानंतर रशियन कॉस्मोनॉट कॅप्सूल अंतराळ स्थानकाजवळ पोहोचले.
- आधीच उपस्थित असलेले दोन रशियन, चार अमेरिकन आणि एक जर्मन अंतराळवीरांनी या तिघांचेही स्वागत केले.
स्पेस सूटसाठी हाच रंग का?
- रशियन सरकार आणि अंतराळ संस्थेने पिवळ्या-निळ्या स्पेस सूटमध्ये अंतराळवीर का पाठवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- अंतराळवीरांना त्यांच्या स्पेससुटबद्दल विचारले असता, प्रत्येकाने त्यांच्या आवडीचा हा रंग निवडल्याचे सांगितले.
- आम्हाला स्पेस सूटचा रंग निवडण्याचे स्वातंत्र्य होते, म्हणून आम्ही ते निवडले. आमच्याकडे अनेक पिवळ्या वस्तू होत्या, त्यामुळे त्यांचा वापर करणे आवश्यक होते.