मुक्तपीठ टीम
आजच्या काळात पीसी किंवा लॅपटॉप न वापरणारे लोक फार कमी भेटतील. पीसी विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी, कोठेही शैक्षणिक असाइनमेंटवर काम करण्यासाठी आवश्यक लवचिकता आणि स्वातंत्र्य देतो. कुठेही असलो तरी लॅपटॉप आपल्याला आपले काम आपल्यासोबत आणण्याची परवानगी देतो. अभ्यासासाठी, ऑफिस कामासाठी, वैयक्तिक वापरासाठी पीसी आणि लॅपटॉपचा वापर होतो. पीसी किंवा लॅपटॉपची गती कमी होण्याची समस्या सर्वांनाच भेडसावते.
समस्या माहित असते, पण कशी सोडवायची ते कळत नाही. जुन्या संगणकांमध्ये ही समस्या जरा जास्तच सतावते. कोणतेही काम करताना त्रास होतो. ही समस्या पीसी किंवा लॅपटॉपमध्ये कधी ना कधी उद्भवते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अगदी सोप्या टीप्स जाणून घेऊया.
रीसायकल बिन करा रिकामा!
- पीसी आणि लॅपटॉपचा रीसायकल बिन भरतो तेव्हा त्यांची गती कमी होते. वेळोवेळी ते रिकामे ठेवणे महत्वाचे आहे.
- या व्यतिरिक्त, फाईल महत्वाची नसेल तर ती Shift + Delete सह हटवावी.
- ती फाइल रीसायकलिंग बिनमध्ये न जाता कायमची हटवली जाईल.
डेस्कटॉपवर आणि सी ड्राइव्हमध्ये काही नको!
- पीसी आणि लॅपटॉपच्या सी ड्राइव्हमध्ये फोटो किंवा व्हिडिओ टाकू नका, फक्त सेटअप आणि प्रोग्राम फाइल्स त्यात ठेवा.
- अनेक लोक सी ड्राइव्हमध्ये अनेक फाईल्स सेव्हही करतात, ज्यामुळे संगणकाची गत कमी होण्याची समस्या निर्माण होते.
टेम्प आणि करप्ट फाइल हटवा!
- संगणकावरून TEMP आणि करप्ट फाइल्स हटवा.
- या साठी स्क्रिनच्या खालच्या भागातील डाव्या कोपऱ्यातील सर्चमध्ये RUN टाइप करा.
- उघडलेल्या रनच्या विन्डोत %temp% टाइप करा आणि एंटर बटण दाबा.
- तात्पुरत्या फायलींची यादी समोर उघडेल, जी निवडून हटवू शकता.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा TEMP फाइल हटवा.