मुक्तपीठ टीम
सध्या ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ऑर्थर रोड कारागृहात आणि त्यामुळे चर्चेबाहेर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात डॉक्टर-कंपाउंडर गाजवले होते. त्यांना लक्ष्य करताना भाजपा नेत्यांनी अनेकदा डॉक्टर-कंपाउंडर शब्दच वापरले. आता तेच शब्द राष्ट्रीय राजकारणात गाजू लागले आहेत. निमित्त ठरले आहेत, काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद. त्यांनी “आजारी काँग्रेस डॉक्टरांकडून नव्हे तर, कंपाउंडरकडून औषध घेत आहे.” असा टोला लगावला आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा आपल्या जुन्या पक्षावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “देशातील सर्वात जुन्या पक्षाचा पाया कमकुवत झाला आहे. तो कधीही तुटू शकतो. आजारी काँग्रेस डॉक्टरांकडून नव्हे तर, कंपाउंडरकडून औषध घेत आहे. काँग्रेस नेतृत्वाला गोष्टी सुरळीत करण्यासाठी वेळ नाही.” असे म्हटत त्यांनी कॉंग्रेस पक्षावर टोला लगावला. पक्षाच्या सदस्यांना एकत्र ठेवण्याऐवजी त्यांचे राज्यांतील नेते सदस्यांना जाऊ देत आहेत, असेही ते म्हणालेत.
“सोनिया गांधी १९९८ ते २००४ या काळात वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत होत्या. त्यांनी त्याच्या सूचना मान्य केल्या. जबाबदारीही दिली. पण २००४ पासून राहुल गांधी संसदेत पोहोचल्यानंतर सोनिया गांधी समन्वय, सल्लामसलत यासाठी राहुल गांधींवर अधिक अवलंबून राहू लागल्या. राहुल गांधी चांगले व्यक्ती आहेत, पण त्यांच्याकडे राजकीय पात्रता नाही” असे ते म्हणाले.
‘प्रत्येक आईची तिची मुलं ही कमजोरी असतात’- आझाद!
- प्रत्येक आईची तिची मुलं ही कमजोरी असतात.
- राहुल गांधी जे करत होते त्याकडे सोनिया गांधींनी दुर्लक्ष केले.
- भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवरही आझाद बोलले.
- काँग्रेसमधील २३ नेत्यांनी पत्र लिहिले असतानाही मी स्वतःचा पक्ष काढणार असल्याच्या अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या.