मुक्तपीठ टीम
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिसंख्य पदावरील ५९० कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट न मिळाल्याने दिवाळी अंधारात घालवावी लागणार असून दिवाळी भेट म्हणून महामंडळाने जाहीर केलेली रुपये ५ हजार इतकी रक्कम अधिसंख्य पदावर काम करणाऱ्याना तात्काळ मिळावी यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या कर्मचाऱ्यांना २१/०७/२०२१ रोजी जे वेतन मिळत होते. त्याच कायम ( स्थिर)वेतनावर ठेवण्यात आले असून. राज्य शासनाने रोजगार टिकावा तसेच मानवतावादी दृष्टिकोन व प्रशासनाची अडचण समजून सदरचे पद निर्माण केले आहे व सदर कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोकरीत कायम ठेवले आहे.
या शिवाय त्याना कोणतेही आर्थिक लाभ देऊ नयेत असेही निकष शासनाने घालून दिले आहेत. राज्य परिवहन महामंडळाने सुध्दा मानवतावादी दृष्टिकोन म्हणून नोकरी देताना या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त व त्या त्या पदाची ओळख म्हणून गणवेश, त्याला लागणारा शिलाई भत्ता व धुलाई भत्ता सुध्दा दिला आहे. याशिवाय आरोग्य सुविधा म्हणून वैद्यकीय भत्ता सुध्दा दिली आहे. सन २०१६ पासून युती सरकारच्या काळात तात्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अनेक वर्षे बंद असलेले सानुग्रह अनुदान दिवाळी भेट म्हणून एस. टी. कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेल्या वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना रु.२,५०० व अधिकाऱ्यांना रु.५०००/- अशी रक्कम दिली जात होती. या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रु.२५०० या रक्कमेत वाढ केली व कर्मचारी व अधिकारी सरसकट रु.५,०००/- इतकी रक्कम देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ही चांगली व सुखद बाब आहे. पण या संदर्भातील परिपत्रक प्रसारीत करतांना महामंडळ स्तरावर सदरची दिवाळी भेट रक्कम अधिसंख्य पदावर काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देय असणार नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. रा.प. महामंडळातील दि. इतर कर्मचाऱ्याना मात्र ज्यांचे १८/१०/२०२२ रोजी हजेरी पत्रकावर ज्यांचे नाव आहे अशाना ही रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम भेट म्हणून असल्याने त्यांच्या उपस्थितीचा सुध्दा विचार केलेला नाही. अधिसंख्य पदावर जे कर्मचारी व अधिकारी दि.१८/१०/२०२२ रोजी कार्यरत आहेत त्यांना सुध्दा ही दिवाळी भेट रक्कम मिळणे क्रमप्राप्त असताना त्यांना यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अधीसंख्य पदातील चालक, वाहक व यांत्रीकी कर्मचाऱ्यांना गणवेश, शिलाई भत्ता, धुलाई भत्ता व वैद्यकिय भत्ता हे मानवतावादी दृष्टिकोन व महामंडळाची ओळख म्हणून व सामाजिक दृष्टिकोन ठेवून दिले जात आहे. मग याच भावनेतून दिवाळी भेट का दिली जात नाही ? असा सवालही बरगे यांनी केला असून शासनाने व एस्.टी. महामंडळाने जो दृष्टिकोन ठेऊन या कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम ठेवले आहे व काही भत्ते सुध्दा सुरु ठेवले आहेत. तोच दृष्टिकोन ठेवून दिवाळीसाठी महामंडळातील इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे रु.५,०००/- इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून दिली आहे, त्याच भावनेने रुपये ५०००इतकी रक्कम अधिसंख्य पदावर काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुध्दा देण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी पत्राद्वारे केली आहे.