मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर ७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांवर आणि प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीचे कोटकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता मंदिर प्रशासन व शासकीय विभागाने घेणार आहेत.
मंदिर उघडण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र बी. भोसले यांनी जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार, शिर्डी साईबाबा मंदिरात जास्तीत जास्त १५ हजार भाविकांना परवानगी आहे, तर शनि शिंगणापूर मंदिरात दररोज २०,००० भाविकांची संख्या असेल. शिर्डी साई बाबा मंदिर भाविकांसाठी ५,००० पेमेंट पास, ५,००० ऑनलाइन पास आणि ५,००० ऑफलाइन पास जारी करत आहे. कोणत्याही वेळी मंदिर परिसरात १,१५० पेक्षा जास्त भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.
ही आहे नियमावली
- डॉ. भोसले यावेळी म्हणाले की, शासनाच्या ११ ऑगस्ट २०२१ च्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करतांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- प्रत्येकाने ६ फुटांचे अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलींचे मंदिर व परिसरात सक्तीने अंमलबजावणी करण्यात येईल.
- तसेच मंदिर प्रवेशापूर्वी प्रत्येक भक्तांचे थॅर्मल स्कॅनरद्वारे शरीराचे तापमान तपासले जाईल.
- कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
- यामध्ये १० वर्षाखालील बालकांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्यक्तीत तसेच मास्क न वापरणाऱ्या भक्तांना जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
- तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने रात्री साडेआठ वाजेनंतर बंद करण्यात याव्यात.
- मंदिरात प्रवेश देतांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही.
- दर्शनासाठी येतांना पुजेचे साहित्य आणू नये.
- पुजेच्या साहित्यासह आत प्रवेश दिला जाणार नाही.
- मात्र जास्तीत जास्त भाविकांनी कोरोना लसीकरण करूनच मंदिर प्रवेश करावा.
बैठकीत शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटे आणि राशिन देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यांशी मंदिर नियमावली बाबत चर्चा केली. मंदिर प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या हमीपत्रांवरील बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर अहमदनगर जिल्हयातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता. कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरले आहे.