मुक्तपीठ टीम
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने तरुणाला दोषी ठरवून आठ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोषींना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मैत्रीला प्रेम समजू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. भिन्न लिंगी मित्र असण्याचा अर्थ असा नाही की तो त्याच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे.
मुंबईतील एका तुरुणाविरुद्ध आयपीसीच्या कलम ३५४ (डी) आणि ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. बलात्कार झालेल्या पीडितेचे वय १३ वर्षे आहे, त्यामुळे या प्रकरणात पॉक्सो कायद्याची कलमे लावण्यात आली. विशेष पॉक्सो न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश प्रीती कुमार यांनी बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने सांगितले, ‘पीडितेची संमती नव्हती हे स्पष्ट आहे. विरोध सिद्ध करण्यासाठी संघर्षाच्या खुणा दाखवल्याच पाहिजे असे नाही. न्यायालयाने म्हटले की, ‘रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बलात्काराच्या एक दिवस आधी आरोपीने पीडितेला सांगितले की, तो तिच्यावर प्रेम करतो. पीडितेने तत्काळ तिच्या आईला त्याबद्दल माहिती दिली होती.
तरुणाच्या कृत्यामुळे मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त
- न्यायालयाने सांगितले की, आरोपीनं मैत्रीच्या आड गंभीर गुन्हा केला.
- आरोपीच्या त्या कुकृत्याने मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
- न्यायालयाने स्पष्टपणे बजावले की, ‘अल्पवयीन व्यक्तीची संमती ही संमती नसते, ही कायद्यातील कायम तरतूद आहे.
- त्यामुळे न्यायालयाने आरोपींना आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत तरुणाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.