मुक्तपीठ टीम
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचे पुतणे मुबशर आझाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गुलाम नबी आझाद यांचे सगळ्यात छोटे बंधू लियाकत अली यांचा मुलगा मुबशर आझाद आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्या काकांचा अपमान केल्याचे दुःख झाल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे मुबशर यांनी म्हटलं आहे. मुबशर आझाद यांचे भाजपा मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष रविद्र रैना, माजी आमदार दलीप परिहार आणि एसटी मोर्चाचे अध्यक्ष हारून चौधरी यांनी स्वागत केले.
रैना म्हणाले की, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने राज्य लुटण्याशिवाय काहीही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळातील लोकशाही मजबूत करण्यासाठी भरीव पावले उचलली आहेत.
राज्यात राहणाऱ्या सर्व समाजाला अधिकार देण्यात आले. मुबशर आझाद यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला डोडा, किश्तवाड, रामबन आणि इतर भागात ताकद मिळेल, असे रैना म्हणाले. मुबशर आझाद म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा अपमान केला आहे. यामुळे ते दुखावले आहेत. काँग्रेस पक्षाच्या या वर्तनामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेस पक्षांतर्गत संपूर्ण कलह सुरू आहे.