मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ वकील आर वेंकटरमनी यांची भारताचे नवे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्येष्ठ वकील वेंकटरमनी यांची राष्ट्रपतींनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी के. के वेणुगोपाल यांची जागा घेतली आहे ज्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. ९१ वर्षीय वेणुगोपाल यांची जुलै २०१७ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
वेंकटरमनी यांच्याआधी केंद्र सरकारने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना ही ऑफर दिली होती. मात्र केंद्र सरकारची ही ऑफर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नाकारली. आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचेही रोहतगी यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत वेंकटरमनी?
- १९ एप्रिल १९५० रोजी पूद्दूचेरी येथे जन्मलेले वेंकटरमनी जुलै १९७७ मध्ये तामिळनाडूच्या बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून रुजू झाले.
- १९७९ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
- १९९७मध्ये त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील म्हणून नामांकित केले होते.
- वेंकटरमनी यांची २०१० मध्ये कायदा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि पुन्हा २०१३ मध्ये दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो…
- भारत सरकारमध्ये अॅटर्नी जनरल हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
- सामान्यत: अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.
- अॅटर्नी जनरलची नियुक्ती भारत सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात.
- भारत सरकारच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराची भूमिका अॅटर्नी जनरल बजावतात.