मुक्तपीठ टीम
डोंबिवलीतील शिवसेना शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो पुन्हा लावण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात प्रचंड राडा झाला होता. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली होती. शिवसेनेच्या महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले. याप्रकरणी शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी डोंबिवलीतील राम नगर पोलीस ठाण्यात कविता गावंड यांच्या विरोधात तक्रार दिली. यावरून गावंड यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
- डोंबिवली मध्यवर्ती शाखेतच खासदार डॉ शिंदे यांचे देखील कार्यालय आहे.
- मात्र शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी खासदार कार्यालयातील शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवून शिंदे समर्थकांना शाखेत येण्यास प्रतिबंध केला होता.
- मात्र मंगळवारी शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखेत शिरले.
- त्यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शिंदे यांचे हटवलेले फोटो पुन्हा भिंतीवर लावले.
- यावेळी शाखेत उपस्थित असलेल्या ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकामध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती.
- यावेळी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली होती.
- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
- यामुळे शाखेला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्याने महिला पदाधिकाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल !!
- पुरुष कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या ठाकरे समर्थक महिला कार्यकर्त्यांची पोलिसांनी दखल घेतली नव्हती.
- यानंतर काही वेळातच पोलिसांनी गावंड यांच्यावर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.
- शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात भादवी १५३ अ आणि ५०५ कलमाअंतर्गत तक्रार दिली होती.
- त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.
- ही शाखा कविता गावंड यांच्या वडिलांच्या काळातच बांधण्यात आली होती. तरीही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं संतापाचं वातावरण आहे.