मुक्तपीठ टीम
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न गाजतोय. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरमध्ये घेण्याचं निश्चित केलं आहे. तोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदार नियुक्तीसंदर्भात कोणतेही पावलं उचलू नयेत तसेच राज्य सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
पुढील सुनावणी नोव्हेंबरला-
- मुंबई उच्च न्यायालयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका करणारे नाशिकमधील रतन सोली लुथ यांनी उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
- त्यांच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफव न्यायमर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी सुरु आहे.
- सुनावणीत राज्यपालांनी त्यांची बाजू न मांडल्यानं सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.
- राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- आता पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम!!
- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केली जात होती.
- महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदारांच्या यादीचा मुद्दा राज्यपालांनी मुद्दामून प्रलंबित ठेवला, अशी टीकाही करण्यात आली होती.
- दरम्यान, शिंदे-भाजपा सरकार आल्यानंतर १२ आमदारांच्या नियुक्तीवर तातडीने निर्णय घेण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आलेला होता.
यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. - मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आलीय.