मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जावी. ही रक्कम किती असेल, याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच यासंदर्भातले गाईडलाईन्स ६ आठवड्यात बनवण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेत. दरम्यान, दाखल केलेेल्या याचिकेमध्ये ४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली गेली आहे.
याच याचिकेविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरवण्यात आली आहे. कोर्टाने किती रक्कम दिली जावी हे ठरवलेलं नाही. मात्र NDMA अंतर्गत राष्ट्रीय प्राधीकरणाद्वारे ही रक्कम ठरवली जावी, असं म्हटलं आहे.
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये नुकसान भरपाई आणि मृत्यूप्रमाणपत्राबाबत समान नियमांबाबत दाखल याचिकेवर २१ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय झाला. वकील दीपक कंसल आणि गौरव कुमार बंसल यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.
कोरोना काळात कामगार मंत्रालयाने ईएसआयसी सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यास ईएसआयसी सदस्यांच्या आश्रितांना किमान १८०० रुपये दरमहा पेन्शन मिळेल. यासंदर्भात कामगार मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून या योजनेसंदर्भात महिन्याभरात सूचना मागविल्या आहेत.
कर्मचारी राज्य विमाधारकांनंतर आश्रितांना पेन्शन
• सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच कर्मचारी राज्य विमा योजनेचे सदस्य असणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांसाठी पेन्शनचाही निर्णय झाला आहे.
• कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ईएसआयसी कोविड रिलीफ स्किमला अधिसूचित केले आहे.
• ईएसआयसी कायद्याच्या कलम १९ अंतर्गत या योजनेस अधिसूचित करण्यात आले आहे.
• मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की या योजनेंतर्गत कोरोनामुळे विमाधारकाच्या मृत्यूवर मदत उपायांची तरतूद करण्यात आली आहे.
• योजनेंतर्गत, विमा उतरलेल्या व्यक्तीची कोरोना झाल्याच्या तीन महिन्यांपूर्वी ईएसआयसीच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी झालेली असली पाहिजे.
राज्य विमाधारकांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांना पेन्शनविषयी अधिक माहितीसाठी वाचा:
कामगार विमा योजनेतील सदस्यांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांना दरमहा पेन्शन!