उदयराज वडामकर
मराठी चित्रपटाचे माहेर घर असणाऱ्या कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी आंदोलकांनी शुक्रवारी सामुहिक आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या २५१ दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या बचावासाठी त्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठींबा दिला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला पत्र लिहत तोडगा काढण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान जयप्रभा स्टुडिओचा वाद नेमका काय आहे हे जाणून घेऊया….
नेमकं प्रकरण काय?
- भालजी पेंढारकर यांच्याकडून लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ घेतला होता.
- मात्र मागच्या वर्षी कोरोना काळात कोणाला कळू न देता जयप्रभा स्टुडिओची विक्री झाली होती.
- ही माहिती पुढे येताच आंदोलकांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले.
- चित्रपट व्यावसायिक व रंगकर्मींच्या वतीने गेल्या २५१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
- मात्र, शासनाने त्याची दखल घेतलेली नाही.
- अखेर आंदोलकांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलन तीव्र करू व सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा दिला होता.
जयप्रभा स्टुडिओचा इतिहास काय सांगतो?
- मूकपटांच्या काळात छत्रपती राजाराम महाराज यांनी ‘कोल्हापूर सिनेटोन’ची, तर त्यांच्या भगिनी आक्कासाहेब महाराज यांनी ‘शालिनी सिनेटोन’ची उभारणी केली.
- कोल्हापूर सिनेटोन या स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकर यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
- राजाराम महाराजांच्या काळात कोल्हापूर सिनेटोन भालजींना विकण्यात आला.
- त्यानंतर भालजींनी त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ असे नामकरण केले.
- राज कपूर, दादा कोंडके यांच्यासह अनेकांनी या स्टुडिओत काम केले आहे.
- राज कपूर याच स्टुडिओमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरे गेले होते.
पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकरांना विकला-
- १९४८मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जाळपोळ झाली.
- पुढे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
- बँकेचे कर्ज वाढत गेले.
- ते भागवण्यासाठी भालजींनी स्टुडिओ आणि परिसराची जागा आणि पन्हाळा येथील बंगला लता मंगेशकर यांना विकला होता.
- लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओ चालवण्याचा सुरुवातीच्या काळात प्रयत्न केला.
- पुढे त्यांचे कामाच्या व्यापामुळे स्टुडिओकडे साहजिकच दुर्लक्ष झाले.
- लता दीदींनी सुद्धा हा स्टुडिओ विकायला काढला.
- मात्र चित्रपटाचे माहेरघर असलेला हा स्टुडिओ चित्रपटासाठीच राखीव असावा या हेतूने कोल्हापूरकरांनी थेट लता मंगेशकर यांच्या
- विरोधात तीव्र लढा उभारला हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते.
- मात्र तोपर्यंत या स्टुडिओच्या जागेवरील ९ एकर जागा लता दीदींनी विकली.
- तर उर्वरित जागा हेरिटेज म्हणून महापालिकेने संरक्षित केली.
- मात्र असे असतानाही या स्टुडिओची विक्री झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचाही यात सहभाग !!
- दरम्यान, जयप्रभा स्टुडियोची खरेदी कोल्हापूरातील श्री महालक्ष्मी स्टुडिओज या कंपनीने विकत घेतली.
- जवळपास साडे सहा कोटी रुपयांना व्यवहार झाला.
- यामध्ये एकूण दहा भागीदार आहेत.
- मात्र, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची दोन मुले ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि
- पुष्काराज राजेश क्षीरसागर यांचा समावेश असल्याने या प्रकरणाला अजून महत्व आले.
- स्टुडिओ विक्रीची बातमी बाहेर येताच लोकांचा तीव्र संताप पाहून क्षीरसागर यांची त्तकाळ प्रतिक्रिया देत आम्ही हा स्टुडिओ पुन्हा द्यायला
- तयार आहोत, आम्हाला शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी अट घातली.
- त्यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली.
- मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी केवळ आश्वासन दिल्याने कलाकारांनी शुक्रवारी टोकाचे पाऊल उचलले.
- तर यावर निर्णय न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दिलाय.