मुक्तपीठ टीम
मृत्यू दाखला व त्याच्या प्रती देण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करणारा आर/मध्य विभागातील मृत्यू नोंदणी कारकून संतोष तांबे याला महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. तांबे हे बाभई हिंदू स्मशानभूमी येथे १७ जानेवारी २२ रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या रात्रपाळीत कार्यरत होते.
भारतातील श्रीमंत मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना दरमहा बक्कळ पाच आकडी पगार मिळत असतानाही काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, कारकुनांची लाच घेण्याची वृत्ती अजूनही संपलेली नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
तांबेनी त्यांचे कर्तव्य पार पाडताना नितांत सचोटी राखली नाही तसेच कर्तव्यपरायणता ठेवली नाही. महापालिकेच्या कर्मचा-याला अशोभनीय ठरेल असे कृत्य त्याने केले. हे कृत्य गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीचे असल्याने त्यांना प्राथमिक / खात्यांतर्गत सर्वंकष चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले आहे.
शशांक राव यांनी मुंबई पालिकेच्या ‘ट्विटर’ या समाजमाध्यमावर तक्रार केली. आर/मध्य विभाग अंतर्गत कार्यरत एका कर्मचा-याने पैशांची मागणी करुन ते स्वीकारल्याबद्दल ही तक्रार होती. महापालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी त्याची तातडीने दखल घेतली. त्यांनी दिलेल्या दूरध्वनी आदेशानुसार आर/मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी बाभई स्मशानभूमीत जाऊन तक्रारीची शहानिशा केली. त्यावेळी त्यांना या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले.
तांबे यावेळी मृत्यू नोंदणी कारकून म्हणून कार्यरत होता. राजेंद्रकुमार कृष्णदास किनारीवाला (वय ७२) यांचे पार्थिवअंत्यसंस्कार करण्यासाठी १८ जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजता बाभई स्मशानभूमीत आणले होते. संस्कार करुन आटोपल्यावर मृत्यू दाखला कुठे मिळेल, याबाबत शशांक राव यांनी कर्तव्यावर हजर असलेल्या तांबे यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तांबे यांनी मृत्यू दाखला मी काढून देऊ शकतो, असे राव यांना सांगितले. प्रत्येक दाखल्याच्या प्रतीसाठी १०० रुपये लागतील, असेही तो म्हणाला. राव यांनी ५ प्रती पाहिजे, असे सांगून तांबेना ५०० रुपये दिले, अशी माहिती शहानिशा करताना निष्पन्न झाली.
चौकट करणे
मृत्यू दाखल्याची पहिली प्रत विनामूल्य
मृत्यू दाखल्याची पहिली प्रत विनामूल्य मिळते आणि त्यानंतर प्रत्येक छायाप्रतीसाठी ६ रुपये आकारले जातात, अशी माहिती महापालिकेच्या अधिका-यांनी दिली.