मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना युपीए नेतृत्वबदलाच्या विषयावरून चांगलेच सुनावले आहे. त्यामुळेच बहुधा आजचा दिवस वेगळा ठरला. संजय राऊत यांनी आज भाजपाला कमी आणि काँग्रेसलाच जास्त झोडले. युपीएचा विषय केंद्रीय पातळीवर असल्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यावर बोलू नये, असे त्यांनी पटोलेंना फटकारले. त्यांना विषयाचा अभ्यास नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी मारला. तसेच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ, असेही राऊतांनी बजावले.
राष्ट्रीय विषयावर राज्य, जिल्हा स्तरावरील नेत्यांनी बोलू नये!
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे.
- यूपीए नेतृत्वाच्या प्रश्नावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ.
- शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही.
- युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये.
- हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे.
- हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे.
सोनिया गांधी – राहुल गांधीही बोलत नाहीत, चिंतनच करत आहेत!
- हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये चर्चा होऊ नये.
- राष्ट्रीय विषयांवर दिल्लीत चर्चा होते आणि तिथेच त्यावर चर्चा झाली पाहिजे.
- या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ.
- पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत.
- माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत.
भाजपाचा पराभव कसा करणार?
- या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही, तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं.
- ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे.
- युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं.
- युपीए २ ची गरज वाटते का? आतापर्यंत तिसरी, चौथी, पाचवी आघाडी अशा नौटंकी झाल्या आहेत, त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे जी आताची आघाडी आहे ती कशी मजबूत होईल हे पाहणं गरजेचं आहे.
- दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्या चिंतेनं मी हे सांगितलं आहे”.