मुक्तपीठ टीम
सचिन वाझे प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडी सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचा गंभीर आरोप त्यांनी केला. या पत्राची पडताळणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
‘लेटरबॉम्ब’नंतर संजय राऊतांचं ट्विट
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला आहे. “हमको तो बस तलाश नए रास्तो की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है” असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे या ट्विटमधून राऊत यांना नेमकं काय म्हणायचं? या ट्विटमधून राऊत काय संकेत देत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शुभ प्रभात… pic.twitter.com/lKWKS9pFkf
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 21, 2021