मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची आता ईडी कोठडीतून आणि रोजच्या चौकशीतून सुटका झाली आहे. आता त्यांचा मुक्काम ऑर्थर रोड कारागृहात असेल. इतर प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली तर जामीन मिळवणं सोपं जातं, पण ईडीच्या पीएमएलए कायद्याखालील गुन्ह्यांमधील आरोपींसाठी ते तेवढंसं सोपं नसतं. त्यामुळे अशक्य नसला तरी राऊतांसाठी जामीनाचा मार्ग सोपाही नाही.
आता संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात होणार आहे. न्यायालयीन कोठडीत म्हणजे कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा देण्यात आली आहे.
वर्षा राऊतही ईडी चौकशीच्या फेऱ्यात!!
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. सुमारे ९ तासांच्या चौकशीदरम्यान ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊतच्या खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा पुरावा ईडीला सापडल्यामुळे वर्षा राऊतची चौकशी केली जात आहे.
नेमके काय आहेत संजय राऊतांवर आरोप?
- गोरेगाव परिसरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासाशी संबंधित १ हजार ३४ कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळ्याची ईडी चौकशी करत आहे.
- ईडीने ३१ जुलैच्या रात्री संजय राऊत यांना अटक केली.
- स्थानिक न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती.
- ईडीचे म्हणणे आहे की संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाने गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पात कथित आर्थिक अनियमिततेद्वारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न केले आहे, जे गुन्ह्याच्या श्रेणीत येते.
- ईडीने संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या दोन सहआरोपींची सुमारे ११.५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
- ही मालमत्ता गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक आणि संजय राऊत यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे.
- या मालमत्तांमध्ये वर्षा राऊत यांचा मुंबईतील दादर येथील फ्लॅट आणि अलिबागमधील किहीम समुद्राच्या काठावरील आठ भूखंडांचा समावेश आहे.
- ईडीच्या म्हणण्यानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड चाळीच्या पुनर्विकासात सहभागी होती.
- या चाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) ४७ एकर जागेत ६७२ भाडेकरू राहत होते.
वाचा संजय राऊतांविरोधात वापरलेल्या कायद्यामुळे जामीन का अवघड:
ईडीनं पीएमएलए कायद्याखाली अटक केल्यावर जामीन मिळवणं सोपं का नसतं? जाणून घ्या तरतुदी…