मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिरं आणि मशिदींवरून राजकारण सुरु आहे. त्यात आता नवी भर पडतेय ती साईबाबांच्या मूर्तीवरून नव्यानं सुरु करण्यात येत असलेल्या वादाची. हिंदूंच्या मंदिरांमध्ये साईबाबांची मुर्ती हटवण्याचा ठराव काशीत सनातनी धर्म महंतांनी मंजूर केला आहे. श्री काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि सनातन दलाचे संरक्षक डॉ.व्ही.सी.तिवारी यांनी काशीच्या मंदिरांमध्ये साईंची मूर्ती असू नये असे सांगितले आहे.
मंदिराच्या महंत आणि सेवकांना विनंती आहे की साईंची मूर्ती आदरपूर्वक मंदिराच्या आवारातून हटवण्यात यावी. सनातन धर्माचे वैदिक नियम याला अजिबात परवानगी देत नाहीत. सोमवारी मंदिरातून साईंची मूर्ती आदरपूर्वक बाहेर काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
साईंच्या मूर्ती हटवण्याचा प्रस्तावाला मंजुरी
- श्रद्धाळू सनातन धर्मियांना वेगळे करण्यासाठी कटकारस्थानांनी चांद मियाँ यांना साईबाबा बनवून प्रचार केला.
- कोणत्याही मंदिरात मृत मानवाच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करू नये.
- हिंदू धर्मात सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पाच देवतांव्यतिरिक्त फक्त त्यांच्या रूपांची पूजा करता येते.
- मनुष्य केवळ आपल्या गुरूची किंवा आईवडिलांची मानवी स्वरूपात पूजा करू शकतो, परंतु तेही वैयक्तिक आहे.
- त्यामुळे साईंची मूर्ती लवकरात लवकर मंदिरातून बाहेर काढा.
- या प्रस्तावाला केंद्रीय ब्राह्मण महासभेचे प्रदेशाध्यक्ष आणि सनातन रक्षक दलाचे राज्य प्रभारी अजय शर्मा, पं वाचस्पती तिवारी, हिमांशू राज, अभिषेक मिश्रा, भानू मिश्रा, महेश उपाध्याय आणि अनेक मंदिरांच्या महंतांनी पाठिंबा दिला.
हिंदू मंदिरातील साईंची मूर्ती अधार्मिक
- अखिल भारतीय संत समाजाचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, जिथे श्रद्धा आणि भक्ती आहे, तिथे त्याची पूजा करावी.
- कुणाला साईंचे मंदिर करून पूजा करायची असेल,तर करा पण हिंदू मंदिरात साईंची मूर्ती अधार्मिक आणि अवैध आहे.
- संत समाज याला समर्थन देत नाही, पण याचा अर्थ असा नाही की आपण कोणाच्या तरी श्रद्धा आणि भक्तीला कलंक लावावा.