मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर या प्रकरणात आरक्षणविरोधी भूमिका घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक प्रतिक्रया व्यक्त केली आहे. “जसा करोनाचा व्हायरस आहे तसं सर्वोच्च न्यायालयानं आज मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस म्हटलं आहे न्यायाधीशांनी मराठा आरक्षण हे अल्ट्रा व्हायरस म्हटले असे सदावर्ते म्हणाले. त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत ही खूपच आक्रस्ताळी होती, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोपर्डी प्रकरणात न्यायासाठी पुढाकार देत लढा उभारणारे नगर जिल्ह्यातील संजीव भोर यांनी सदावर्तेंचे विधान भावना दुखावणारे असल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला सदावर्ते यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञाने कोरोना व्हायरससारखे म्हणणे समाजात विद्वेष पसरवणारे असल्याचेही ते म्हणाले. याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन आपण पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. ‘मुक्तपीठ’शी बोलताना अॅड. सदावर्ते यांनी मात्र ते घटनेच्या चौकटीतच योग्यच बोलले असल्याचा दावा केला.
काय म्हणाले अॅड. सदावर्ते?
- जसा करोनाचा व्हायरस आहे तसं सर्वोच्च न्यायालयानं आज मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस म्हटलं आहे.
- मराठा आरक्षण दिले जाऊ शकत नाही.
- सर्वच न्यायाधीशांचे एकमत आहे की घटनेची मर्यादा ओलांडू नये.
- इंदिरा साहनी खटल्याचा पुनर्विचार करण्याची गरज नाही
- अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला पाहिजे.
- त्यांनी सर्व समाजाचे मंत्री आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
- त्यांनी खुल्या समाजातील गुणवंतांची माफी मागितली पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयानं कोणता शब्द वापरला असावा?
सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी याबाबतीत विचारणा केली असता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सदावर्ते म्हणतात तसा Ultra Virus शब्द वापरला नसावा तर Utra Vires हा कायदेशीर शब्द वापरला असावा, असे मत व्यक्त केले. Utra Vires म्हणजे acting or done beyond one’s legal power or authority म्हणजेच एखाद्याच्या कायदेशीर अधिकाराबाहेर असे म्हटले असावे. सदावर्ते यांनी मात्र Virus शब्द वापरत आक्रस्ताळी प्रतिक्रिया दिली आहे.
मी घटनेच्या चौकटीतच बोलतो
याबद्दल अॅड सदावर्ते यांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जसे क्लिनिकल व्हायरस असतात तसे घटनेच्या उल्लंघनाच्याबाबतीतही असे काही व्हायरस असतात. मी ते त्यासंदर्भातच बोललो आहे, असं म्हटलं. तुम्ही कोरोना व्हायरसशी जोडले, असं विचारलं असता, त्यांनी कोरोना व्हायरसप्रमाणे घटनेचा भंग करणारे कृत्यही तसंच असल्याचे म्हटले. आपण कधीही घटनेच्या बाहेर जात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.