मुक्तपीठ टीम
मोदी सरकारचे मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी अभिनेत्री व भाजपा खासदार हेमामालिनी यांच्या गालाशी रस्त्यांची केलेली तुलना निषेधार्ह आहे. महिलाबाबत अशा प्रकारची भाषा कोणीही वापरू नये. महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी हेच शब्द हेमामालिनींबद्दल वापरले तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी बोंब ठोकणारे भाजपा नेते गप्प का? महिलांच्या बाबतीत भाजपाची भूमिका दुटप्पी असून भाजपामध्ये भाजपाच्याच महिला नेत्यांचा सन्मान ठेवला जात नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे
सावंत पुढे म्हणाले की, भाजपा खासदार हेमामालिनी व महिलांबदद्ल कोणीही अशी भाषा वापरणे निषेधार्ह आहे. मोदी सरकारने महिला अत्याचारांच्या विरोधात भूमिका घेऊ असे अभिवचन दिले होते. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एक केंद्रीय मंत्री भाजपाच्याच महिला खासदारांबद्दल असे बोलतो हे गंभीर आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या व्याख्येनुसार भाजपाच्या नेत्याने भाजपाच्याच महिला खासदाराचा विनयभंग केला आहे. वाघ यांनी यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसेच गाल पाहणा-याचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही म्हटले होते. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही केली होती. आता ही मंडळी चिडीचूप आहेत.
भाजपा नेत्यांनी आता कुलस्ते यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुन्हा दाखल करण्यासाठी आवाहन करावे, अशी मागणी सावंत यांनी केली. शिवाजी महाराजांचा रांजाच्या पाटलांबद्दलचा दाखलाही त्यांनी दिला होता. आज शिवजयंती आहे, भाजपा नेत्यांना खरेच महिलांबाबत काही वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या खासदारांबदद्ल त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याने केलेल्या विधानाबदद्ल त्यांना संताप यायला हवा. अपेक्षा आहे की भाजपा नेते हेमामालीनींच्या या विनयभंगाबदद्ल तातडीने कारवाईची मागणी करतील. त्यांना नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भीती वाटत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.
फग्गनसिंह कुलस्ते यांनी हेमामालीनींबाबत त्याच पठडीतील वक्तव्य केले आहे जे गुलाबराव पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र पोलिसांना विनयभंग दिसत नाही का असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता मग आता तुम्हाला त्याच वक्तव्याबद्दल विनयभंग झाल्याचे दिसत नाही का? विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाईची सिलेक्टिव्ह मागणी करणे चुकीचे आहे. कोणीही असो महिलांचा आदर राखला गेला पाहिजे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच मोदी सरकारचे मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनीही माफी मागितली पाहिजे. हेमामालिनी महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्याने राज्य महिला आयोग त्याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे, असे सावंत म्हणाले.