मुक्तपीठ टीम
अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर भारतीय चलनाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारतीय रुपया कमजोर नाही तर डॉलर मजबूत होत आहे. इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपया चांगली कामगिरी करत असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी २४ द्विपक्षीय बैठका घेतल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “मी यापूर्वीही सांगितले आहे की रुपया लवकरच त्याच्या पातळीवर पोहोचेल.” यासोबतच भारताच्या डिजिटल कामगिरीबद्दल बोलताना त्यांनी जी-२० आणि क्रिप्टोकरन्सीमधील भारताच्या अध्यक्षपदाबद्दलही सांगितले.
जी-२० च्या अध्यक्षपदावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “आम्ही अशा वेळी अध्यक्षपद स्वीकारत आहोत जेव्हा अनेक आव्हाने आहेत. आम्हाला सदस्य देशांसोबत जवळून काम करावे. आम्हाला जी-२० दरम्यान क्रिप्टोकरन्सीशी संबंधित प्रकरणावर चर्चा करायची आहे, ज्यामुळे जी-२० चे सदस्य यावर चर्चा करून संपूर्ण जागतिक स्तरावर एक नियम बनेल.
रुपया कमजोर होण्याची कारणे
- परदेशातील बाजारात अमेरिकन डॉलरच्या सततच्या मजबूतीमुळे रुपया कमजोर होत आहे.
- यूएस फेड रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदर ७५ बेसिस पॉइंटने वाढवल्यामुळे डॉलर मजबूत आहे.
- वाढत्या व्याजदरामुळे परदेशी गुंतवणूकदार अधिक नफ्यासाठी अमेरिकन बाजाराकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे.
- याउलट, भारतीय बाजारपेठेत विक्रीचे वातावरण परतले आहे.
- गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत, त्यामुळे रुपयाही कमजोर झाला आहे.