मुक्तपीठ टीम
‘महाराष्ट्र दिना’निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एक भन्नाट उपक्रम झाला. पाच हजारांपेक्षा जास्त रुबिक्स क्युब्स वापरून शिवछत्रपतींची भव्य प्रतिमा साकारली गेली. हा विश्व विक्रम आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये नुकताच ‘महा उत्सव’ साजरा झाला. त्यात मुंबई, रायगड , पुणे व नवी मुंबई येथील ५०२३ शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी भाग घेतला. त्यांनी १३ बाय १२ फुटाची शिवरायांची प्रतिमा तीन तासांमध्ये साकारली. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रतिमा बनवण्यात आली. ‘एन डी आर्ट वर्ल्ड’ आणि सहआयोजक ‘व्हर्सैटाईल एज्युकेशन सिस्टीम’ यांच्या पुढाकाराने हा विश्व विक्रम करण्यात आला.
महाराष्ट्राच्या महान परंपरेचा वारसा जपणाऱ्या ‘महा उत्सव’ची १ मे रोजी सांगता झाली. महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरले. श्रेयसी वझे आणि मंदार आपटे यांच्या संकल्पनांतर्गत बनलेले ‘महाराष्ट्र गीत’ यावेळी सादर करण्यात आले. तर गायक नंदेश उमप यांचा ‘मी मराठी’ हा सुरेल कार्यक्रम आणि मराठ्यांची गौरव गाथा मांडणाऱ्या ‘महा नाट्य’ यांनी रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाला देशातील वेगवान कृषी आणि मत्स्यपालन कंपनी ‘ए एस अॅग्री’ आणि ‘अॅक्वा एलएलपी’ यांचे सहकार्य लाभले आहे. व्हर्टिकल फार्मिंग क्लस्टर प्रकल्पाद्वारे हळदीच्या क्रांतिकारक उत्पादनाबाबत जागरूकता करणारा प्रकल्प यावेळी सादर करण्यात आला.
“नितीन चंद्रकांत देसाई यांच्याद्वारे आयोजित हा महा उत्सव कलाकारांचा व कलेचा महाकुंभ आहे. या महाउत्सवमध्ये कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळाले, रोजगार मिळाला. विशेष म्हणजे सर्वांना या ठिकाणी प्रवेश विनामूल्य देऊन या उत्सवाचा लाभ घेता आला. त्याबद्दल नितीन देसाई यांचे मी कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो.” असे मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले
”पँडेमिकनंतर हजारो कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं, रोजगार उपलब्ध व्हावे या उद्देशाने महा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. अनेक कलाकारांची स्वप्न साकार होत असल्याने या उत्सवाचा उद्देश साध्य होत असल्याचं पाहून समाधान वाटतं.” अशा भावना ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यक्त केल्या. ‘महाकला’ उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडले. कलाकार सचिन जुवाटकर यांनी उद्योगपती रतन टाटा यांचं साकारलेलं चित्र चर्चेचा विषय ठरलं. मोती, तुळस, रक्तचंदन आदी गोष्टींचा वापर करत हे चित्र त्यांनी बनवलं. हे चित्र पाहताच सचिन यांना टाटा फाऊंडेशकडून फोन आला असून लवकरच ते रतन टाटा यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
पाहा व्हिडीओ: