मुक्तपीठ टीम
“रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (आठवले) कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. पण निवडणुकीत राजकीय यश मिळवण्यात आपण कमी पडतो. आगामी निवडणुकांत रिपाइंला चांगले यश मिळवायचे असेल तर सर्व जाती-धर्मातील लोकांना सहभागी करून पक्षाला मजबूत करा,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी पुणे जिल्हातर्फे पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा नागरी सत्कार व कोरोनायोद्ध्यांचा सन्मान आणि उमेश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. बावधन बुद्रुक येथील माता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या या सोहळ्यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, ऍड. मंदार जोशी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, माहिपाल वाघमारे, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “बौद्धांच्या ताकदीर आपला पक्ष उभा आहे. पण अंतर्गत हेवेदावे आणि इतर समाजाचा पाठिंबा नसल्याने आपल्याला स्वतंत्र निवडणुका जिंकण्यात अपयश येते. सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत केला, तर आपण निवडणूक जिंकू शकतो. भारतीय जनता पक्षासोबत आपली युती असून, पुणे महानगरपालिकेत भाजप-रिपाइंची सत्ता येईल. मागासवर्गाचे आरक्षण पडले, तर पुण्यात आपल्या पक्षाचा महापौर होईल. तसा शब्द भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे.”
उमेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी बावधन भागात रिपाइं विस्तारत असून, येत्या निवडणुकीत या भागातून पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सूर्यकांत वाघमारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.