मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयात आज एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ११ जुलैची तारीख दिली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा देत अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे सचिव, केंद्र व उपसभापतींसह इतरांना नोटीस बजावली आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या सुरक्षेची खात्री करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, अशी पावले उचलावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
१२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही!!
- १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे.
- पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
- ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाला पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे हवी आहे.
- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल देऊ असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
- आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिली आहे.
- त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.