मुक्तपीठ टीम
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या दूरसंचार सेवा कंपनी रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला कंपनीचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने याबाबतची माहिती २८ जून २०२२ रोजी दिली आहे.
कंपनीचे नेतृत्व नव्या पिढीच्या हाती
आतापर्यंत मुकेश अंबानी रिलायन्स जिओचे अध्यक्ष होते. त्यांचा राजीनामा आणि आकाश अंबानी यांची नियुक्ती हे नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवताना दिसत आहे. मुकेश अंबानी हे जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडचे अध्यक्ष राहतील.
आकाश अंबानीच्या नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता
- कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यकारी संचालक आकाश अंबानीची, कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
- त्याआधी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- यासोबतच पंकज मोहन पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्याचवेळी रामिंदर सिंह गुजराल आणि केव्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंडळात काही नवीन लोक जोडले गेले
- ब्राउन युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्समध्ये पदवीधर असलेल्या आकाश अंबानीशिवाय आणखी काही नवीन लोकांचा कंपनीत समावेश करण्यात आला आहे.
- पंकज मोहन पवार यांची रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- रामिंदर सिंह गुजराल आणि केव्ही चौधरी यांना बोर्डावर अतिरिक्त संचालक करण्यात आले आहे.
- दोघांची ५ वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांनी २०२१ मध्येच धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या उत्तराधिकारीबद्दल प्रथमच सार्वजनिक विधान केले होते. रिलायन्सला आता नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे ते म्हणाले होते.