मुक्तपीठ टीम
रॅप गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर बादशहाचं नाव पैसे देऊन यूट्युबर गाण्याचे व्ह्यूज वाढवल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता या फेक व्ह्यूजप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आरोपपत्र दाखल केले आहे. ४४६ पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी दावा केला आहे की, आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया उर्फ बादशाहने त्याच्या एका व्हिडिओला ७२ लाख व्ह्यूज मिळवण्यासाठी ७४ लाख रुपये दिले आहेत. मात्र, रॅपर बादशहाने ज्यांच्याकडून फेकव्ह्यूजचे काम करून घेतले त्या एजेंसीच्या क्लाएंटविरोधातील कारवाईबद्दल माहिती पुढे आलेली नाही. तसेच हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा माध्यम क्षेत्रातील काहींनी आणि काही सेलिब्रिटींच्या अकाऊंटवर फेक व्ह्यूज वाढवून घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यावरही पुढे काहीच झालेले नाही.
‘पागल’ गाण्यासाठी फेक व्ह्यूज!
- गायिका भूमी त्रिवेदी हिने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही चौकशी सुरु झाली.
- तिने आरोप केला आहे की, कोणीतरी त्याच्या बनावट आयडीने इंस्टाग्रामवर लोकांशी संपर्क साधत आहे.
- बादशाहसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या सीएफओनेही फेक व्ह्यूजची कबुली दिली आहे.
- बादशाहने ‘पागल’ गाण्याचे व्ह्यूज वाढवण्यासाठी ७४,२६,३७० रुपये दिले आहेत.
आरोपपत्रात ११ पंच, २५ साक्षीदार आणि ५ आरोपींची नावे आहेत. ५ पैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या खटल्यात बादशाह आणि कोयना मित्रा यांची साक्षीदार म्हणून नावे आहेत. या प्रकरणातील एका आरोपीने दावा केला आहे की, त्याने ७ – ८ लोकांचे फॉलोअर्स वाढवले आहेत.
बादशाहची खरेदी उघड, इतरांचं काय?
- चौकशीदरम्यान बादशाहने पोलिसांसमोर फेक व्ह्यूज विकत घेतल्याची कबुली दिली.
- वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी हे केल्याचे त्याने सांगितले.
- याआधी रॅपरने एका निवेदनात म्हटले होते की, समन्सनंतर मी मुंबई पोलिसांशी बोललो. माझ्यावरील सर्व आरोप मी फेटाळून लावले आहेत. मी अशा प्रकारांमध्ये कधीच सहभागी नव्हतो.
- पोलिसांनी फेक व्ह्यूज रॅकेटचा पर्दाफाश करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.
- ज्याचा कथितपणे सेलिब्रेटी आणि माध्यम क्षेत्रातील काहींकडून फॉलोअर्स, लाईक्स आणि पोस्टवरील कमेंट्स वाढवण्यासाठी केला जात होता.
आता मात्र इतरांबद्दल काहीच उघड झालेले नाही.